भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याला १३ जुलैपासून सुरुवात
मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ सोमवारी श्रीलंकेत दाखल झाला. भारताचे बहुतांश प्रमुख खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये असल्याने श्रीलंका दौऱ्यासाठी बऱ्याच नवख्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. भारताचे हे खेळाडू मागील काही दिवस मुंबईमध्ये क्वारंटाईन होते. भारतीय संघ आता श्रीलंकेत दाखल झाला असून खेळाडू २९ जून ते १ जुलै या कालावधीत हॉटेलमध्ये क्वारंटाईन असतील. त्यानंतर २ ते ४ जुलै या कालावधीत त्यांना टप्प्याटप्प्याने सराव करण्याची परवानगी असेल. ५ जुलैपासून ते एकत्र सराव करण्यास सुरुवात करतील.
Touchdown Sri Lanka 📍🇱🇰#TeamIndia 🇮🇳 #SLvIND pic.twitter.com/f8oSX7EToh
— BCCI (@BCCI) June 28, 2021
भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याला १३ जुलैपासून सुरुवात होणार आहे. भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये तीन एकदिवसीय व तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. कर्णधार विराट कोहली सध्या इंग्लंडमध्ये असल्याने श्रीलंका दौऱ्यात शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची उपकर्णधार म्हणून नेमणूक झाली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसलेल्या सहा खेळाडूंची या भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामुळे या संघात अनुभवी आणि नवख्या खेळाडूंचे चांगले मिश्रण असल्याचे कर्णधार धवन म्हणाला होता.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकारिया.






