दारूच्या नशेत बापानेचं घेतला दीड वर्षीय चिमुरडीचा जीव

लातूर (प्रतिनिधी) : दीड वर्षीय पोटच्या मुलीला आपल्याच बापाने जीवे मारल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे. सदर घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना, औसा येथील आशिव या गावात घडली आहे. दरम्यान, बापाने हे कृत्य दारूच्या नशेत केलं असून, सदर घटना शुक्रवारी २५ मे रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. सृष्टी भोंडे असे मृत चिमुरडीचे नाव आहे. बापानेच दारूच्या नशेत मुलीला ठार मारल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शुक्रवारी संतोष भोंडे (वय २९) हा आपल्या दीड वर्षीय सृष्टी आणि चार वर्षांचा मुलगा या दोघांसोबत घरी होता. संतोष भोंडे यांच्या घरातील सर्व सदस्य रोज कामानिमित्त आणि शेताकडे गेले होते. याचाच फायदा घेत तो रोजच्या सवयीप्रमाणे दिवसभर दारू पीत होता. दिवसभर मोठ्या प्रमाणात दारू पिल्याने तो आपल संतुलन गमावून बसला. आणि त्याने दुपारी चारच्या सुमारास आपल्या मुलाला काही कारणास्तव बाहेर पाठवले आणि त्यांनतर घरीच असलेल्या स्वतःच्या अवघ्या दीड वर्षीय सृष्टीला चापटा, थोबाडीत मारून घरातच असलेल्या पाण्याच्या हौदात फेकून दिले. त्यामुळे अवघ्या दीड वर्षाच्या चिमुरडीचा जीव गेला.

दरम्यान , संध्याकाळच्या सुमारास संतोष भोंडे यांची पत्नी घरी आली आणि त्यांनी पाहिले तर मुलगी हौदात पडलेली दिसली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि हा प्रकार उघडकीस आला. सृष्टीचे आजोबा गंगादास भोंडे यांनी भादा पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली. त्या आधारे मुलगा संतोष भोंडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून, संतोषला अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक नाना लिंगे, पोलिस उपनिरीक्षक मुळीक, हेड कॉन्स्टेबल गिरी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here