मोबाईल नेटवर्कचा शोध घेणे विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले

ऑनलाइन वर्गात हजेरी लावण्याकरिता नेटवर्क मिळविण्यासाठी ज्या झाडावर चढले त्यावरच कोसळली वीज

डहाणू (प्रतिनिधी) – मोबाइल नेटवर्कच्या शोधात झाडावर चढलेल्या मुलांच्या अंगावर वीज पडून घडलेल्या भीषण दुर्घटनेत एकाचा मृत्यू, तर तीन जखमी झाली आहेत. डहाणू तालुक्यातील ओसरविरा गावात आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, डहाणू तालुक्यात सोमवारी दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकटाला सुरुवात झाली. यादरम्यान, तालुक्यातील ओसरविरा गावच्या मानकरपाडा येथील काही मुलं मोबाइल रेंज मिळावी म्हणून उंबराच्या झाडावर चढली होती. सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास या झाडावर वीज कोसळली आणि भीषण दुर्घटनेला या मुलांना सामोरं जावं लागलं.

वीज अंगावर कोसळून रविन बच्चू कोरडा (वय १६) याचा जागीच मृत्यू झाला तर चेतन मोहन कोरडा (वय ११), दीपेश संदीप कोरडा (वय ११) आणि मेहुल अनिल मानकर (वय १२) हे तिघे जखमी आहेत. यापैकी चेतन आणि दीपेश या दोघांना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर मेहुल याला अधिक उपचारासाठी धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहे.

मृत पावलेला रविन हा इयत्ता नववी शिकत होता. जखमी विद्यार्थी हे सहावी ते आठवी इयत्तेत शिकणारे आहेत. या गावात मोबाइला रेंज येत नसल्याने ही मुले पाड्यापासून दीड किमी अंतरावर झाडावर चढून नेटवर्क मिळविण्याच्या प्रयत्नात होती. तर काही झाडाखाली खेळत असताना ही घटना घडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here