बेळगाव (प्रतिनिधी) : कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चार भावांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. हा प्रकार बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील हल्ल्याळ गावात घडला असून या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. कृष्णा नदीच्या घाटावर ही घटना घडली. गोपाला बनसोडे, सदाशिव बनसोडे, शंकर बनसोडे, दऱ्याप्पा बनसोडे अशी बुडालेल्या भावांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील हल्ल्याळ गावात गोपाला बनसोडे, सदाशिव बनसोडे, शंकर बनसोडे, दऱ्याप्पा बनसोडे हे एकाच कुटुंबातील चार भाऊ कृष्णा नदीत कपडे धुण्यासाठी गेले होते. मात्रस यावेळी अचानकपणे हे चारही जण नदीवरच्या घाटावजवळ बुडाले. चारही भाऊ गायब असल्याचे समजताच नदीघाटावर एकच खळबळ उडाली. नंतर या चारही भावांना नदीमध्ये जलसमाधी मिळाल्याचे समजले.
हा प्रकार बुडालेल्या चार भावांच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. घटनेनंतर नातेवाईकांचा आक्रोश सुरु आहे. स्थानिक नागरिक तसेच मच्छीमार यांच्या मदतीने बुडालेल्या चारही भावांचा शोध घेणे सुरु आहे.






