पेण-दादर गावातील बेकायदेशीर सक्शनपंप व वाळू उपसाबाबत कारवाई करणार – विठ्ठल इनामदार

प्रांताधिकारी यांनी बेकायदेशीर सक्शनपंप धारकांवर कारवाईचे आश्वासन दिल्याने साखळी उपोषण मागे

पेण-सोगावकर: पेण तालुक्यातील दादर गावातील हात पाटीवर जगणाऱ्या गोरगरिबांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आणि बेकायदेशीर सक्शन पंपाने वाळूचे उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याचे निषेधार्थ ग्रामस्थांनी मुंबई-गोवा हायवेवरील हमरापूर फाटा येथे सामूहिक साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. यावाबत प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी ग्रामस्थांची प्रांत कार्यालयात बैठक घेऊन बेकायदेशीर सक्शन पंप धारकांवर कारवाईचे आश्वासन दिल्याने साखळी उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, नायब तहसीलदार धनंजय कांबळे,दादर सागरी पोलिस ठाण्याचे पो.नि.गोविंदराव पाटील, दादर सरपंच विजय भानुदास पाटील, विजयभाऊ पाटील, यशवंतदादा घासे, ऍड.स्वागत पाटील, मोहन नाईक,दिपकशेठ पाटील,एकनाथ पाटील, भगवान पाटील,वसंत जोशी, निलेश घासे, सुरेश पाटील, गंगाधर भोईर आदी उपस्थित होते.

दादर हा गाव हे एक बेट आहे. सन 1989 च्या महापुरामध्ये दादर गावातील बंदिस्ती वाहून गेल्याने संपूर्ण दादर गावातील शेत जमीन खाऱ्या पाण्याने बुडाली होती. त्यामुळे दादर गावातील लोकांचा हात पाटीने वाळू काढणे हा एकमेव व्यवसाय राहिला. या व्यवसायावर येथील लोक आपली उपजीविका करतात आणि आपले जीवन जगतात.

गेल्या काही दिवसांपासून अज्ञात वाळूमाफिया वाळूची चोरी करण्याकरिता खारफुटीच्या झाडांची कत्तल करून जमिनीची खुदाई करतात आणि बेकायदेशीररित्या सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा करत आहेत. यासंबंधी दादर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमार्फत सरपंच विजय भानुदास पाटील तसेच सर्व सदस्य यांच्या वतीने बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या सक्शन पंपावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर सोमवारी दिनांक 28 जून 2021 रोजी मुंबई-गोवा हायवेवर हमरापूर फाटा येथे सामूहिक साखळी उपोषणाला बसणार असा इशारा दिला होता. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली.pen-andolan

यावेळी प्रांताधिकारी यांनी, बेकायदेशीर सक्शनपंप धारकांवर कारवाई करणार असून ग्रामस्थांनी होडी व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here