१८ ते ४४ वयोगटातील १५ टक्के लोकांनी घेतली लस
नवी दिल्ली : सध्या कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगाला वेठीस ठरलं आहे. अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाय सापडला नसला तरी कोरोना लसीकरणामुळे कोरोनापासून काही अंशी बचाव करणं सहज शक्य होत असल्याचं तज्ज्ञांच म्हणणं आहे. अशातच जगासह भारतातही कोरोना लसीकरण मोहीमेनं वेग धरला आहे.
केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ६० वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या जवळपास ४९ टक्के लोकसंख्येला कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एकूण ३३.१ कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. २१ जूनपासून २८ जूनपर्यंत दररोज ५७.६८ लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.
एक मेपासून २४ जूनपर्यंत ५६ टक्के लसीचे डोस ग्रामीण भागांत देण्यात आले आहेत. तर ४४ टक्के लसीचे डोस शहरी भागांत देण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, १८ ते ४४ वयोगटातील जवळपास ५९.७ कोटी नागरिकांपैकी १५ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.






