तेल अविव : अत्याधुनिक शस्त्रे विकसित करण्यात आघाडीवर असलेल्या इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने पोलारिस सॉल्यूशन्स या इस्रायली कंपनीसोबत एक खास तंत्रज्ञान विकसित केले आहे. याचा वापर केल्यानंतर जवान अचानकपणे ‘अदृश्य’ होणार आहेत. या खास आवरणाचा वापर केल्यानंतर सैनिक हे एखाद्या खडकासारखे दिसणार आहेत. त्यामुळे शत्रुंपासून त्यांना बचाव करता येणार आहे.
विकसित केलेल्या या आवरणाला किट ३०० असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये लपण्यासाठी थर्मल व्हिज्युअल मटेरियलटचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये धातू, मायक्रोफायबर आणि पॉलिमरचा वापर झाला आहे. त्यामुळे सैनिकांना ओळखताच येणार नाही. याच मटेरियलचा वापर एका स्ट्रेचर म्हणून करता येऊ शकते. हे उपकरण वापरल्यानंतर सैनिकांनी डोळ्यांनी अथवा थर्मल इमॅजिन उपकरणांच्या मदतीने ओळखता येऊ शकत नाही.
इस्रायली सैनिकांनी याची चाचणी केली आहे. आता लष्करासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. पोलारिस सॉल्यूशन्सचे सहसंस्थापक असाफ यांनी अशा प्रकारचे खास उपकरण तयार करण्याचे ठरवले. वर्ष २००६ मध्ये झालेल्या लेबनॉन युद्धाच्या वेळी असाफ इस्रायली सैन्यात होते. सैनिक थर्मल इमॅजिंग उपकरणाच्या मदतीनेही पूर्णपणे सुरक्षित नसल्याचे त्यांना जाणवले. अमेरिका आणि कॅनडालाही हे तंत्रज्ञान देण्याचा विचार कंपनी करत आहे.






