भाजपा नगरसेवकांच्या प्रवेशाबाबत चर्चा- खडसेंचा खुलासा
जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : जिल्ह्यातील व शहरातील शिवसेना गोटात गेल्या काही दिवसांपासून धुसफुस सुरु असतांनाच शिवसेनेच्या महापौर महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन दाम्पत्याने आज बुधवारी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची जळगावातील निवासस्थानी जावून भेट घेतली. यावेळी महापौर व विरोधी पक्षनेत्यांनी खडसेंसोबत अर्धातास बंदद्वार चर्चा झाल्याने शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
दरम्यान या भेटीत जळगाव शहराचा विकासाबाबत तसेच भाजपातून बाहेर पडण्याच्या तयारीत असलेल्या नगरसेवकांच्या प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहीती एकनाथ खडसे यांन पत्रकारांशी बोलतांना दिली. सुनील महाजन यांनी, महाविकास आघाडीचे एकनाथ खडसे जिल्ह्यातील मोठे नेते आहेत. तसेच मनपातील सत्तांतरात देखील त्यांचा मोठे श्रेय होते, यामुळेच ही भेट घेतली असल्याचे सांगितले.
जळगाव शहर महापालिकेच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय कुरघोडींना वेग आला आहे. महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातून २७ नगरसेवक फुटून शिवसेनेच्या गोटात दाखल झालेत. या बंडखोर नगरसेवकांची मोट बांधून शिवसेनेने आपला महापौर जळगाव निवडून आणून महापालिकेवर सत्ता काबीज केली. मात्र, त्यानंतर शिवसेनेत निष्ठावंत नगरसेवक व नविन आलेले बंडखोर नगरसेवक यांच्यात धुसफुस सुरु आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेत झालेल्या फेरबदलांमधील नविन नियुक्त्यांमुळे देखील शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली होती.
या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी शिवसेनेच्या महापौर जयश्री महाजन व त्यांचे पती व विरोधीपक्ष नेते सुनिल महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची त्यांच्या निवास्थानी जावून घेतलेली भेट अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. भेटीदरम्यान महाजन दाम्पत्याने खडसे यांच्यासोबत अर्धातास बंदद्वार चर्चा देखील केली. यावेळी यावेळी राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील व माजी उपमहापौर सुनील खडके हे देखील उपस्थित होते.






