मिश्र दुहेरी गटाच्या पहिल्या फेरीत सानिया-बोपण्णा विजयी

स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारताच्याच दोन जोड्यांमध्ये मिश्र दुहेरी गटात सलामीचा सामना

लंडन : विम्बल्डन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरी गटात भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झाने रोहन बोपण्णाच्या साथीत खेळताना पहिल्या फेरीत सहज विजय मिळवला. या जोडीने रामकुमार रामनाथन व अंकिता रैना या आपल्या देशाच्या जोडीवर ६-२, ७-६ अशी सरळ दोन सेटमध्ये मात केली.

या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारताच्याच दोन जोड्यांमध्ये मिश्र दुहेरी गटात सलामीचा सामना झाला. पुरुष एकेरीत तब्बल २१ वेळा पात्रता मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेल्या रामकुमार रामनाथनला कारकिर्दीत प्रथमच विम्बल्डन ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत पदार्पणाची संधी मिळाली. सानिया व बोपण्णा जोडी प्रथमच एकत्र आली होती. या जोडीने अत्यंत वेगवान सर्व्हिसचे प्रदर्शन केले व रामनाथन आणि अंकिता जोडीवर मात करत दुसरी फेरी गाठली. दरम्यान, पोलंडची मानांकित टेनिसपटू इगा स्वेटेकने रुमानियाच्या इरिना कॅमेलिया बेगू हिचा ६-१, ६-० असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.

महिला एकेरीच्या अन्य सामन्यांत एलिना रायबाकिनानेशेलबी रॉजर्सचा ६-१, ६-४ असा पराभव केला. कॅरोलिना प्लिस्कोव्हाने तेरेजा मार्टिनकोव्हावर ६-३, ६-३ अशी सहज मात केली. आर्यना सबालेंकाने मारिया कॅमिला ओसोरो सेरियानोवर ६-०, ६-३ असा विजय मिळवला. पुरुष एकेरीत फ्रान्सिस तौफुचा ६-३, ६-४, ६-४ असा पराभव करत कॅरेन काछानोव्हने सनसनाटी निकाल नोंदवला. आंद्रे रुब्लेव्हने फाबीओ फॉगिनीवर ६-३, ५-७, ६-४, ६-२ अशी मात केली. ख्रिस्तियन गॅरीननेही आगेकूच करताना पेड्रो मार्टिनेजचा ६-४, ६-३, ४-६, ६-४ असा पराभव केला.

दुसऱ्या मानांकित मेदवेदेवने कालरेस गार्फियावर ६-४, ६-१, ६-२ अशी मात केली. ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉम्पसनने जपानच्या केई निशिकोरीवर ७-५, ६-४, ५-७, ६-३ असा विजय मिळवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here