पॅरिस : फ्रान्स-भारतादरम्यान झालेल्या राफेल लढाऊ विमान करार भ्रष्टाचार प्रकरणी फ्रान्समध्ये चौकशी सुरू करण्यात आली आहे. या कथित गैरव्यवहार प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीच्या फेऱ्यात फ्रान्समधील अनेक मोठ्या व्यक्ती अडकण्याची शक्यता आहे. या प्रकरणी फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅनुएल मॅक्रॉन यांच्यासह माजी राष्ट्रपती ओलांदे यांचीही चौकशी होऊ शकते.
राफेल करार झाला तेव्हा मॅक्रॉन अर्थमंत्री होते. वृ्त्त संस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, तत्कालीन संरक्षण मंत्री आणि विद्यमान परराष्ट्र मंत्री जीन-यवेस ले ड्रियान यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. फ्रान्समधील स्वयंसेवी संस्था ‘शेरपा’ने वर्ष २०१८ मध्ये राफेल करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत तक्रार केली होती. त्यावेळी फ्रान्सच्या पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्व्हिसने (पीएनएफ) ही तक्रार फेटाळून लावली होती. मात्र, पीएनएफने चौकशी सुरू केली आहे. राफेल करार चौकशी प्रकरणी राफेलची निर्मिती करणाऱ्या डसॉल्ट एव्हिएशन विमान कंपनीने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
राफेल कराराबाबतच्या चौकशीसाठी पीएनएफने एका न्यायाधीशाची नियुक्ती केली आहे. फ्रान्समधील ‘मीडियापार्ट’ या वृत्तसंस्थेने राफेल करार भ्रष्टाचाराचा मुद्या लावून धरला होता. एप्रिल महिन्यातही एका भारतीय मध्यस्थाला ‘कोट्यवधींची भेट’ दिल्याचा दावा करण्यात आला होता. पीएफएने जून महिन्यातच अधिकृतपणे चौकशी सुरू केली असल्याचे मीडियापार्टने सांगितले.






