ठाण्यात पोलिसांना बघताच आरोपीनं चौथ्या मजल्यावरून मारली उडी

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : ठाणे जिल्ह्याच्या भिवंडीतील कसई वाडा याठिकाणी शुक्रवारी गुजरात पोलीसाचं पथक आणि स्थानिक भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांवर जमावानं हल्ला केल्याची घटना समोर आली होती. आता या घटनेचा पोलिसांकडून खुलासा करण्यात आला आहे. एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी गेलं असता, आरोपीनं पोलिसांना पाहून चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये संबंधित आरोपीचा जागीच मृत्यू झाला होता. पण संबंधित आरोपीचा मृत्यू पोलिसांनी मारहाण केल्यानं झाल्याचं समजून जमावानं पोलिसांवर हल्ला केला होता.

जमील कुरेशी असं मृत्यू झालेल्या ३८ वर्षीय आरोपीचं नाव आहे. पोलिसांना बघताच आरोपी जमीलनं अटक टाळण्यासाठी चौथ्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून उडी मारली. चौथ्या मजल्यावरून उडी मारल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान मृताचे कुटुंबीय व स्थानिक लोक बाहेर आले आणि पोलिसांनीच त्याचा जीव घेतल्याचा आरोप केला. त्यामुळे संतप्त जमावानं काही पोलिसांना मारहाण केली अशी माहिती भिवंडी परिसरातील उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे.

शुक्रवारी घडलेल्या या थरारक घटनेचे काही व्हिडीओ देखील सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. यामध्ये असंख्य पुरुष आणि महिला पोलिसांना मारहाण करताना दिसत आहेत. काहींनी पोलिसांवर दगडफेकही केली आहे. संबंधित घटनेत भिवंडी पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचारी जखमी देखील झाले आहेत. मारहाण झाल्यानंतर संबंधित दोन्ही पोलिसांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here