अमेरिकन फौजांची माघार : तालिबान्यांकडून महिला आणि पुरुषांवर बंधने
काबूल : अफगाणिस्तानातून अमेरिकी फौजा जसजशा माघार घेत आहेत, तसतसे एकेक शहर, गाव, प्रांत तालिबानी सैनिक पुन्हा ताब्यात घेत आहेत. पुन्हा कब्जा केलेल्या भागांमध्ये तालिबानने कट्टरपंथी कायदे लागू केले आहेत. यामध्ये पुरुषांना दाढी वाढवण्याची सक्ती करण्यात आली आहे. तर, महिलांना घराबाहेर पडताना कुटुंबातील व्यक्तीची सोबत अनिवार्य केली आहे.
अफगाणिस्तानातील मानवी हक्क कार्यकर्ते; तसेच स्वयंसेवी संस्थांनी जगाला पुन्हा तालिबानी राजवटीबाबत सावध केले आहे. अमेरिकी फौजांनी माघार घेताच तालिबानी सैनिक ते भाग सरकारी जवानांचा पराभव करून ताब्यात घेतात व तेथे मनमानी कायदे लागू करतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तालिबानने पत्रकाद्वारे कट्टर कायदे जारी केले आहेत. यानुसार पुरुषांना दाढी वाढवण्याचा नियम करतानाच, केशकर्तनालयात दाढी कापण्यास मनाई करण्यात आली असून, तालिबानने परवानगी दिलेल्या पद्धतीनुसारच केस कापता येणार आहेत.
काही ठिकाणी कोणत्याही पुराव्यांशिवाय ‘न्यायदाना’सही सुरुवात झाली आहे. तखर प्रांतिक परिषदेच्या सदस्यांच्या म्हणण्यानुसार, तालिबानी सैनिकांनी ताब्यात घेतलेल्या भागांत महागाई वाढली आहे. मध्यंतरी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकी फौजांच्या माघारीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. अमेरिकेला पराभूत करून पळवून लावल्याचा भ्रम तालिबानने निर्माण केला आहे. तालिबान व अफगाण सरकारमध्ये अमेरिकाच तोडगा काढू शकते, असे खान यांनी म्हटले होते.






