मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. आज, ५ जुलै आणि उद्या, ६ जुलै अशा दोन दिवसांत हे अधिवेशन पार पडणार आहे. अवघ्या दोन दिवसाचं हे पावसाळी अधिवेशन वादळीच ठरण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांत राज्य सरकार आणि विरोधी पक्षात चांगलीच जुंपली आहे. त्यामुळं विविध मुद्द्यांवर पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमनेसामने येणार आहेत.
यंदा पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम झाला नाही, कोरोनामुळं हा कार्यक्रम रद्द केल्याची माहिती मिळाली. मात्र परंपरा मोडीत काढत पूर्वसंध्येला होणारी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद देखील झाली नाही. तर दुसरीकडे विरोधी पक्षाने मात्र पत्रकार परिषद घेऊन सरकारवर आरोपांची डोफ डागली आहे. कोरोनाच्या नावाखाली लोकशाहीला कुलूप ठोकण्याचं काम या सरकारकडून केलं जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे.
दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनातील प्रमुख मुद्दे :
विधानसभा अध्यक्षपदाची निवड
मंत्र्यांवरचे गंभीर आरोप
कोरोनाकाळातली परिस्थिती
मराठा, ओबीसी आरक्षण
केंद्रातला राज्य सरकारवरचा दबाव
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नावं
राज्यात आता कोरोना दुसरी लाट हळूहळू कमी होऊ लागली आहे. मात्र तरी देखील राज्यावरील संकट मात्र काही कमी झालेले नाही. आता तर राज्यात डेल्टा प्लसचे रुग्ण देखील आढळून आले असून, एका रुग्णांचा यामुळे मृत्यू देखील झाला. हा धोका ओळखून ठाकरे सरकारने पावसाळी अधिवेशन देखील दोन दिवसांचे घेण्याचा निर्णय घेतला आहे.






