प्रतिविधानसभेवर मार्शलची कारवाई; भाजप आमदारांनी गोंधळ घातल्याने परिसरात तणाव

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : आघाडी सरकारने १२ आमदार निलंबित केल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेबाहेरच प्रतिविधानसभा भरवली. त्याचे विधानसभेतही पडसाद उमटले. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी प्रतिविधानसभेला देण्यात आलेला माईक काढून घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर मार्शलांनी प्रतिविधानसभेच्या ठिकाणी पोहोचून माईक काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजप आमदारांनी गोंधळ घातल्याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मार्शलने केलेल्या या कारवाईमुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त करत ही तर आणीबाणी असल्याचा आरोप केला.

भाजप आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत थेट विधानसभेच्या पायरीवरच अभिरुप विधानसभा भरवली. भाजपचे आणि भाजपच्या मित्रपक्षाचे सर्वच आमदार विधानसभेच्या पायरीवर बसले होते. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार आणि राधाकृष्ण विखे-पाटील आजूबाजूलाच बसले होते. यावेळी ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांना अभिरुपी विधानसभाचे अध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहिले. यावेळी त्यांनी काल झालेला प्रकार या अभिरुप विधानसभेच्या अध्यक्षांच्या लक्षात आणून दिला. तसेच सरकारच्या निषेधाचा आणि धिक्काराचा प्रस्ताव मांडला.

फडणवीस यांच्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील, जयकुमार गोयल आणि हरिभाऊ बागडे यांनी या अभिरुप विधानसभेच्या चर्चेत भाग घेतला. ही चर्चा सुरू असतानाच तिकडे विधानसभेतही या अभिरुप विधानसभेचे पडसाद उमटले. सत्ताधारी आमदारांनी अभिरुप विधानसभा बरखास्त करण्याची मागणी केली. तसेच विरोधकांना बाहेर माईक कुणी दिला? माईक देण्याची परवानगी कुणी दिली? असा सवाल करतानाच विरोधकांना देण्यात आलेला माईक काढून घेण्याची मागणी करण्यात आली. आमदार भास्कर जाधव आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा ठासून मांडला. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी तात्काळ माईक काढून घेण्याचे आदेश दिले.

या संपूर्ण प्रकारावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रचंड संताप व्यक्त केला. त्यांनी मार्शल पाठवून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला. मार्शलशी आमचं भांडण नाही. ते आमचे शत्रू नाहीत. माईक काढला तरी आमचा आवाज बंद केला जाऊ शकत नाही. सरकारच्या विरोधात आम्ही बोलतच राहणार. माध्यमांवर मार्शलकरवी मुस्काटदाबी करण्यात आली आहे. ही आणीबाणी आहे, असं फडणवीस म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here