संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले नवे आदेश

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मोठ्या उद्योपतींची बैठक घेऊन त्यांना संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरु ठेवण्याच्यादृष्टीने करावयाच्या तयारी संदर्भात मार्गदर्शन करावे, ज्या उद्योजकांना त्यांच्या उद्योगाच्या आवारात कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे तिथे त्यांनी त्याचे वेळीच नियोजन करावे व ज्या उद्योजकांना ते शक्य नाही त्यांनी कंपनीच्या आसपासच्या परिसरात अशी जागा शोधून कामगारांची तिथे राहण्याची (फिल्ड रेसिंडन्स) व्यवस्था करावी, त्यादृष्टीने त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक असलेले सहकार्य करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे चर्चा करून कोरोना स्थितीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, कोरोनासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्कफोर्सचे पदाधिकारी, टास्कफोर्सचे पदाधिकारी उपस्थित होते.

अजून कोरोनाची दुसरी लाट पूर्णत्वाने ओसरलेली नाही. परंतु याही स्थितीत कॅलक्‍युलेटेड रिस्क घेऊन आपण हळुवारपणे काही आर्थिक उपक्रम सुरू करतांना सावधगिरीची पाऊले म्हणून लागू केलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. कुठेही गर्दी होणार नाही, सभा समारंभ होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय ऑक्‍सीजनच्या तयारीचाही आढावा घेतला त्यांनी ऑक्‍सीजन निर्मिती, ऑक्‍सीजन साठा आणि रुग्णसंख्या वाढल्यास करावयाची पूर्वतयारी यासर्वच प्रक्रियेतील वेग देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. आशा- अंगणवाडीसेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत गावागावात जनजागृती करून कराना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेले सर्वजण दुसरा डोस वेळेत घेतील यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे अशी सूचना मुख्यमंत्र्यानी केली. लसीचे दोन्ही डोस घेऊन करोना बाधित होणाऱ्यांची संख्या, त्याची स्थिती आणि कारणे याचे टास्कफोर्सने विश्‍लेषण करावे, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here