‘रामसे बंधू’मधील कुमार रामसे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

भयकथा असणाऱ्या चित्रपटांसाठी पटकथा लिहिणारे प्रख्यात चित्रपट निर्माते

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : बहुतेक ‘रामसे ब्रदर्स’ निर्मित भयकथा असणाऱ्या चित्रपटांसाठी पटकथा लिहिणारे प्रख्यात चित्रपट निर्माते कुमार रामसे यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कुमार रामसे ८५ वर्षांचे होते. कुमार यांचा मोठा मुलगा गोपाळ यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, कुमार रामसे यांनी मुंबईतील हिरानंदानी येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. कुमार यांच्या पश्चात पत्नी शीला आणि तीन मुले राज, गोपाळ आणि सुनील असा परिवार आहे.

याबद्दल माहिती देताना गोपाळ रामसे म्हणाले की, ‘आज सकाळी साडेपाच वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ते आम्हा सर्वांना सोडून निघून गेले आहेत. रात्री १२ च्या सुमारास त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील. आम्ही सध्या पुजारी येण्याची वाट पाहत आहोत.’

कुमार रामसे हे चित्रपट निर्माते एफ यू रामसे यांचा पुत्र होते. कुमार आपल्या सात भावांमध्ये सर्वात मोठे होते. रामसे बंधूंमध्ये केशु, तुलसी, करण, श्याम, गंगू आणि अर्जुन यांचा समावेश होता. ७० आणि ८० च्या दशकात ते कमी बजेटचे कल्ट चित्रपट बनवायचे.

‘पुराना मंदिर’ (१९८४), ‘साया’ आणि ‘खोज’ (१९८९) यासह रामसे ब्रदर्सच्या बहुतेक चित्रपटांसाठी स्क्रिप्ट लिहिण्यात कुमार यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. ‘साया’ मध्ये मुख्य भूमिका शत्रुघ्न सिन्हा यांनी साकारली होती आणि १९८९ ची हिट फिल्म ‘खोज’ मध्ये अभिनेते ऋषी कपूर आणि नसीरुद्दीन शाह यांच्या मुख्य भूमिका होत्या. १९७९च्या ‘और कौन’ आणि १९८१मध्ये ‘दहशत’ सारख्या चित्रपटांची निर्मिती देखील केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here