उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची प्रकृती चिंताजनक

लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची प्रकृती चिंताजनक आहे. लखनऊच्या एसजीपीजीआय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांची तब्येत अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरुन त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधत प्रकृतीबाबत विचारणा केली आहे. त्याबरोबर त्यांनी त्यांच्या कुटूंबियांना धीर देखील दिला आहे.

दरम्यान, कल्याण सिंग हे उत्तर प्रदेशात भाजपचे मोठे नेते आहेत. अयोध्या रथ यात्रा आणि बाबरी मशिद प्रकरणावेळी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. १९९१ मध्ये ते मुख्यमंत्री झाले. मात्र बाबरी मज्जित प्रकरणानंतर त्यांनी ६ डिसेंबर १९९२ रोजी आपला राजीनामा दिला होता. तर २०१४ मध्ये ते राजस्थानचे राज्यपाल देखील राहिले होते.

कल्याण सिंह यांची तब्येत अचानक बिघडल्यानंतर त्यांना सुरवातीला राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची आरोग्य स्थिती आणखी खालावत चालली होती. त्यामुळे कल्याण सिंह यांना नंतर लखनऊच्या एसजीपीजीआय रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर येत आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी गुरुवारी रात्री उशिरा एसजीपीजीआय रुग्णालयात जाऊन कल्याण सिंग यांची भेट घेतली होती. तर त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील कल्याण सिंग यांना भेटायला गेले. त्यावेळी जे पी नड्डा यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली. त्यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here