लालपरीचा प्रवास महागणार : महागाईने हताश झालेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसणार

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : महागाईने हताश झालेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. एसटीची भाडेवाढ होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. ही भाडेवाढ डिझेल दरवाढी मुळे करण्यात येणार असल्याचे एसटीकडून सांगण्यात आले आहे. यासंदर्भात एसटीकडून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

कोरोनामुळे आधीच पूर्ण क्षमतेने एसटीची सेवा सुरु नाही. तसेच लॉकडाऊनचे निर्बंध असल्याने अनेक मार्गावरील गाड्या बंद आहेत. हा भार असताना डिझेलच्या सतत होणाऱ्या दरवाढीमुळे एसटीवर महिन्याला सुमारे १२० ते १४० कोटींचा अतिरिक्त बोझा पडला आहे. त्यामुळे एसटीने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने भाडेवाढीचा हा प्रस्ताव तयार केला आहे.

याआधी जून २०१८ मध्ये एसटीने १८ टक्के भाडेवाढ केली होती. आता पुन्हा ही भाडेवाढ होणार असल्याने तिकीट दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.एसटी महामंडळाच्या १५ ते १६ हजार बस डिझेलवर धावत आहेत. पूर्ण क्षमतेने एसटी धावतात तेव्हा राज्यभरात दिवसाला एसटीला १२ लाख ५०० लीटर डिझेल लागते. सध्या महामंडळाच्या १० हजार गाड्या धावत आहेत.त्यासाठी ८ लाख लीटर डिझेल एसटीला दिवसाकाठी लागते. तसेच एसटीच्या एकूण महसुलाच्या ३८ टक्के म्हणजेच ३ ते ४ हजार कोटी रुपये फक्‍त इंधनावर खर्च होतात, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here