केरळमध्ये आणखी १४ जणांना झिका विषाणूची लागण

केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी बोलावली तातडीची बैठक

तिरुवनंतपूरम : देशावर कोरोनाचं संकट घोंघावत असताना आता झिका विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यात १४ जणांना झिका विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. १४ जणांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

हा व्हायरस कोरोनाप्रमाणे जीवघेणा नसल्यामुळे पुरेशी काळजी घेतल्यास त्यावर मात करता येऊ शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यानुसार, डासांच्या चावण्यापासून स्वत:चा बचाव करणे आणि लागण झाल्यास पुरेसा आराम करणे आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. असं असलं तरी केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी तातडीची बैठक बोलावली असून परिस्थितीवर नजर ठेवण्यास सांगितलं आहे.

केरळमध्ये सर्वात प्रथम एका गर्भवती महिलेला झिका विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं. महिला ज्या रुग्णालयात उपचार घेत होती, तिथल्याच काही नर्स आणि डॉक्टरांचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवले होते. त्यात ती पॉझिटिव्ह आल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, या २४ वर्षीय महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या व्हायरसचा गर्भवती महिलांमधून त्यांच्या पोटातील बाळांना देखील संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांना अधिक काळजी घेण्यास सांगितलं जात आहे.

एडीस जातीचा डास चावल्यानंतर झिका व्हायरसची लागण होते. या डासांची निर्मिती चांगल्या पाण्यात होते. या डासामुळे डेंग्यू, चिकनगुनिया आणि पिवळा ताप होण्याची देखील शक्यता आहे. झिका व्हायरसचा सर्वाधिक धोका हा गर्भवती महिलांना असतो. विशेषत: याची लागण गर्भातील बाळाला होण्याची शक्यता असते. तसेच बाळाला विविध आजार देखील होण्याची शक्यता असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here