राज्यातील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १४ हजार : सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात
मुंबई (टीम अचूक बातमी) : राज्यात गेल्या २४ तासात ६ हजार ०२६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, ८ हजार २९६ नव्या कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या काहीशी घटली आहे. आज एकूण १७९ रुग्णांनी प्राण गमावले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
आजच्या १७९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख ०६ हजार ४६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०५ टक्के एवढे झाले आहे.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १४ हजार इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १८ हजार २३७ इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात एकूण १६ हजार ५९८ इतके रुग्ण आहेत. त्यानंतर कोल्हापुरात सक्रिय रुग्ण सर्वात जास्त आहेत. कोल्हापुरात ही संख्या १३ हजार ८०६ इतकी आहे. मुंबई महापालिका हद्दीत सध्या ११ हजार ५५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सांगलीत ही संख्या ११ हजार ४६५, साताऱ्यात ही संख्या ७ हजार ९३९, रत्नागिरीत ३ हजार ४९८, रायगडमध्ये ३ हजार ९५२, सिंधुदुर्गात ३ हजार ३३०, तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या २ हजार २८९ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ४७७ इतकी आहे.






