व्हिसा व दूतावास सेवा काबूलमधील भारतीय दूतावासात सुरु राहणार
नवी दिल्ली : भारताने आपले ५० राजनैतिक अधिकारी व सुरक्षा कर्मचारी यांना अफगाणस्तानची राजधानी कंदहार येथील दूतावासातून सुरक्षेच्या कारणास्तव हलवले आहे, कारण तालिबानने काबूलच्या दक्षिणेकडील भागाचा ताबा घेतला आहे.
पन्नास राजनैतिक अधिकारी व सुरक्षा कर्मचारी यांना भारतीय हवाई दलाच्या शनिवारी पाठवण्यात आलेल्या खास विमानाने मायदेशी आणण्यात येत आहे. त्यात इंडो—तिबेट सीमा सुरक्षा पोलिसांचाही समावेश आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले, की तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही काळासाठी भारतात आणले असून कंदहार भागात जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. राजदूतावास बंद करण्यात आलेला नसून स्थानिक कर्मचारी तेथे काम करीत आहेत. भारत अफगाणिस्तानातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वतोपरी आहे. भारतातील अफगाणिस्तानचा दूतावास बंद करण्यात आलेला नाही. भारतीय अधिकाऱ्यांना केवळ काही काळासाठी मायदेशी आणले आहे. हा तात्पुरता उपाय असून स्थिती शांत होईपर्यंत आम्ही अधिकारी व कर्मचाऱ्यांना परत पाठवणार नाही. व्हिसा व दूतावास सेवा काबूलमधील भारतीय दूतावासाच्या माध्यमातून कायम राहणार आहे.






