थोपटवाडी करंजविहीरे येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या खुनाचा गुन्हा उघड

पुणे (नारायण शेळके) – दि.२४/०७/२०२० रोजी आसखेड खु गावचे हददीतील लिंभोरेच्या ढव-याचे शिवारात आसखेड कॅनलचे दरडी लगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली टणटणीचे झुडपात अडचणीमध्ये एका अल्पवयीन १७ वर्षे वयाचे मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत मुलीचे नातेवाईकांना संध्याकाळी ०७/१५ वा. चे दरम्यान मिळुन आला होता. सदर घटनेची खबर मुलीचे मामा यांनी पोलीस स्टेशला दाखल केली. त्यानुसार चाकण पोलीस स्टेशन येथे गुरनं ८४९/२०२० भादवि कलम ३०२,२०१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचे फिर्यादी प्रमाणे मयत मुलगी हि दिनांक २४/०७/२०२० रोजी दुपारी १२/३० वा. चे सुमारास तिचे घरी पाहुणे बहिण व दाजी येणार असल्याने व नागपंचमीचे सणाची खरेदी करण्यासाठी सोबत मोबाईल फोन करंजविहीरे येथील दुकानात पायी चालत एकटीच गेली. त्यानंतर तिच्या मोबाईल फोनवर तिचे नातेवाईक संपर्क साधत होते. परंतु तिचा मोबाईल फोन दुपारी ०३/३० वा. चे नंतर बंद लागल्याने व तिचा संपर्क न झाल्याने आणि ती वेळेत घरी परत न आल्याने त्यानंतर काही कालावधीने घरच्या नातेवाईकांनी तिचा परीसरात शोध सुरू केला असता नमुद अल्पवयीन मुलचा मृतदेह नमुद केले ठिकाणी विवस्त्र अवस्थेत मिळुन आला. फिर्यादी मध्ये फिर्यादी यांनी सदर अल्पवयीन मुलीचा खुन थोपटवाडी करंजविहीरे येथील इसम नामे १)चंद्रकांत पाटीलबुवा कोळेकर वय ४० वर्षे , २) अक्षय किसन कोळेकर वय २४ वर्षे , ३) सुनिल महादेव कोळेकर वय २५ वर्षे सर्व रा. रा. थोपटवाडी करंजविहीरे ता. खेड जि. पुणे यांनी पुर्वीच्या पुर्व वैमनस्यातुन केल्याचे नमुद केले आहे.
एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत डोक्यात झालेल्या गंभीर दुखापतीचे स्थितीत मिळुन आल्याने पोलीसांनी सदर प्रकरणाची प्राधानयाने व गांभीर्याने दखल घेवुन पोलीस उप आयुक्त स्मीता पाटील, सहा. पोलीस आयुक्त, राम जाधव तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस, गुन्हे शोध पथकातील सहा. पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस उप निरीक्षक विजय जगदाळे व कर्मचारी यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली व घटनेच्या सर्व बाजुने तपास सुरू केला. फिर्यादी मध्ये स्थानिक गावातील लोकांचे विरूध्द संशयीत आरोपी म्हणुन संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे गावातील व परीसरातील परिस्थीती संवेदनशिल झालेली होती. मृतदेह मिळालेले ठिकाण हे निर्जन झाडे झुडपे गवत वाढलेले चढ उताराचे कॅनॉलचे बाजुचे असे होते. कोणतेही वाहन घटनास्थळापर्यंत पोहचणे अशक्य होते. व रात्रीचे वेळी घटनास्थळा पर्यंत जाण्याची परिस्थीती कठीण होती. तसेच घटनास्थळ परीसरात मोबाईल नेटवर्क अपुरे होते व पाउसही पडत होता. अशा परिस्थीतीत पोलीसांनी तिन्ही संशयीत आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास सुरू केला व मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी व मृत्युचे कारण व इतर बाबींसाठी ग्रामीण रूग्णालय चाकण येथे पाठविण्यात आला. परंतु काही राजकीय पक्षाचे प्रतीनिधी तसेच नातेवाईकांनी शव विच्छेदन चाकण येथे न करता वायसीएम किंवा ससुन हॉस्पीटल येथे करावे अशी मागणी केल्याने सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससुन येथे पाठविण्यात आला. त्यामुळे शवविच्छेदन होण्यास व शवविच्छेदन अहवाल प्राप्त होण्यास विलंब झाला. दरम्यान सदरच्या अल्पवयीन मुलीच्या मृत्यु प्रकरणाची घटना संवेदनशिल असल्याने विविध शंका उपस्थीत करण्यात येत होत्या. आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी नातेवाईक व इतरांकडुन करण्यात येत होती. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सर्व दक्षता घेणे आवश्यक बनले होते.
दिनांक २६/०७/२०२० रोजी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व इतर राजकिय पक्षाचे पदाधिकारी यांनी घटनास्थळास व मयताचे नातेवाईकांचे घरी तसेच पोलीस आयुक्त कार्यालय येथे भेट देवुन घटनेचा गांभीर्याने तपास करणे व मयताचे नातेवाईकांनी तक्रारीमध्ये दिलेल्या संशयीत आरोपींवर तात्काळ सक्त कारवाई करणे मागणी केली होती. गुन्हयाच्या तपासाच्या कागदोपत्री बाबींची मुदतीत पुर्तता करणे, शवविच्छेदन करणे , शवविच्छेदन अहवाल प्राप्त करणे तसेच कायदा व सुव्यस्था राखणे हे सुध्दा गुन्हा उघडकीस आणणे बरोबर तितकेच महत्वाचे आणि आवश्यक होते.
दरम्यानचे काळात चाकण पोलीस स्टेशन कडील नेमण्यात आलेली विषेश पथके व गुन्हे शाखेकडील __पथके अहोरात्र समांतर तपास करीत होते. संशयीत आरोपींची मा. न्यायालयाने ५ दिवस पोलीस कोठडी रिमांड दिल्याने त्यानुसार त्यांचेकडे तपास चालु होता. सर्व बाजूंनी तांत्रीक, शास्त्रोक्त,बातमीदारांकडुन, भोगोलीक परिस्थिती वरून तसेच नातेवाईकांना समक्ष भेटुन सलग सातत्य ठेवुन तपास चालु होता.
चाकण पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस व गुन्हे शोध पथकातील पोलीस उप निरीक्षक विजय जगदाळे तसेच त्यांचे पथकातील कर्मचारी हे प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून त्याची पडताळणी करीत असतांना नातेवाईकांकडे चौकशी करतांना काही बाबी संशयास्पद निदर्शनास आल्या प्रत्येक बाबीची मुळापासुन खात्री करणे व त्या दृष्टीने तपास करणे जरूरीचे होते. परंतु मयत मुलीचे अंत्यसंस्कार न झाल्याने संबंधीतांकडे समक्ष चौकशी करतांना अडथळे निर्माण होत होते. नातेवाईकांचा रोश त्यानी फिर्यादीत नमुद केलेल्या संशयीत आरोपीकडे असल्याने व ते तसा व्यक्त करीत असल्याने तपास करणे अडचणीचे होत होते.
अंत्यसंस्कार पार पाडल्यानंतर घटनेच्या अभ्यासावरून हालचालींची पडताळणी करून प्राप्त माहिती नुसार खात्री करणे आवश्यक होते त्या अनुषंगाने अशा व्यक्तींना विश्वासात घेवुन अहोरात्र चौकशी करण्यात आली. मयताच्या जाण्यायेण्याचे वेळीचे तसेच मार्गाचे तांत्रीक विश्लेषन करून तिचे वैयक्तीक नातेवाईक यांचेशी असलेले संबंध जवळीक या सर्व बाजुनी तसेच मृतदेह शोधकामी आणि अंत्यसंस्कारास व इतर कामास उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या हालचालींची पडताळणी केले नुसार संशयास्पद हालचाली असलेल्या व्यक्तींकडे सखोल व सातत्य ठेवुन स्वतंत्र रित्या पडताळणी करण्यात येत होती. तांत्रीक विश्लेषना नुसार संशयीत असलेले इसम त्याच बरोबर संशयीत मुलीचे कोणाशी मैत्रीपुर्ण संबंध आहेत काय? लैगीक अत्याचाराचा प्रकार आहे काय? केलेले कृत्य एकाने केले आहे किंवा अनेकाने केलेले आहे? या सर्व बाबींचा तपास नातेवाईकांना विश्वासात घेवुन करण्यात येत होता.
चौकशी व तपासा दरम्यान नातेवाईकांपैकी एक अल्पवयीन (वय १७ वर्षे ) मुलाच्या चौकशी मध्ये मृतदेहाचा शोध घेतेवेळी इतरांना मयत मुलगी हिचा मृतदेह मिळाले नंतर तो तिथे न जाता मयत मुलीचे घरी जावुन ती मयत झाल्याची माहिती मयतेची बहीन व भावांना दिले कडे बाबत माहिती प्राप्त झाली. अल्पवयीन मुलाकडे चौकशी करत असतांना त्याने मयतास मटकीचा डबा दुपारी ०३/०५ वा. चे सुमारास दिला असल्याचे तो सांगत होता आणि तेथुन मयत घरी गेल्याचे सांगत होता. तसेच चौकशीमध्ये मयत मुलीने दुकानातील खरेदी केलल्या वस्तु पिशवीतुन घेवुन घरी जात असतांना त्या पिशवीत असलेल्या वस्तुंची सविस्तर माहिती त्याने दिली. त्यावरून तपास करीत असलेल्या पोलीस पथकांचा संशय त्याचेकडे बळावला व यापुर्वी त्याचेकडे केलेल्या ओघवत्या चौकशीत त्याने मयतेला घरी जाण्यास उशीर झाल्याने तिने घाई घाईने बाहेरूनच मटकीचा डबा घेवुन गेल्याचे सांगीतले होते. त्यामुळे सदर अल्पवयीन मुलाकडे पोलीस स्टेशन कडील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यास व त्याचे नातेवाईकांना विश्वासात घेवुन त्यांचेकडे सलग व सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुली दिली. म्हणुन त्यास ताबा पंचनाम्याने ताब्यात घेण्यात आले. आणि पोलीस स्टेशन कडील विशेष बाल पथकाचे ताब्यात देवुन त्याचेकडे फेर चौकशी करून त्याने दिलेल्या जबाब व निवेदना प्रमाणे त्याचा जबाब नोंदविण्यात आला. त्यामध्ये त्याने सांगीतले की,” मयत मुलगी ही त्याची नात्याने मावशी लागत असुन त्याचेच वयाची आहे. बालपणा पासुन दोघे एकमेकांचे परीचयाचे आहेत व त्यांची वेळोवळी एकमेकांची भेट होते. आणि एक मेकांचे घरी जाणे येणे असते. संशयीत अल्पवयीन मुलगा हा भारूडाचे कार्यक्रमात स्त्री- पात्र करतो. त्यावरून मयत मुलगी ही त्याला अलीकडच्या काळात हिजडया सारखा काय वागतो. हिजडया सारखे काय हसतो असे बोलून त्यास हिणवत असे त्या गोष्टीची त्याला चिड व संताप होता. तसेच अल्पवयीन मयत मुलगी इतरांशी चागले बोलते व त्याचेशी निट बोलत नाही याचा राग होता. त्यामुळे त्याने तीला मारण्याचे ठरविले होते. त्याला क्राईम पेट्रोल, सावधान इंडीया, अश्लिल व्हिडीओ पाहण्याची सवय आहे. त्यामुळे त्याने स्वत: मनात आखणी करून तिला मारण्याचे ठरविले होते. घटनेच्या दिवशी मयत मुलगी ही दुकानात गेल्याचे त्याला माहित होते व तिला परत येण्यास वेळ लागणार याची त्याला जाणीव होती.मयताचे घरातुन दुकानाकडे जाण्याचे रस्त्यावर अल्पवयीन मुलाचे घर
आहे. ती दुकानात जातांना व परत येते वेळी दरम्यानचे काळात तो तिचेशी वारंवार फोनवर बोलत होता. __ आणि ती सध्या कोठे पोहचली आहे याची माहिती घेत होता. ती दुकानाकडे गेल्यानंतर तीला परत येण्यास लागणा-या वेळेचा विचार करून त्याने तीचे घरी परत जाण्याचे मार्गावर ओढयातील निर्जन स्थळी मनात आखणी केलेल्या ठिकाणी मार्गावर एक मोठा दगड आणुन ठेवला तसेच एक सागाचे झाडाचे फांदी आणुन ठेवली. व तो परत घरी येवुन तीची वाट पहात थांबला. त्यानंतर थोडयाच वेळात मयत मुलगी घाईत तिची मोठी बहिण घरी येणार असल्याने व तिला जेवण तयार करायचे असल्याने दुकानातील वस्तु घेवुन गडबडीने घरी निघाली होती. ती मटकी घेण्यासाठी त्याचे घरी आली असता तिला त्याने मटकीचा डबा घराबाहेर दिला. मयत ही तिचे घरी पिशवी व मटकीचा डबा घेवुन निघाली व त्याच वेळी पाठीमागुन लगेच अल्पवयीन मुलगा धावत दुस-या मार्गाने जावुन नियोजीत ठिकाणी ती येणे पुर्वी पोहचला आणि झाडाची फांदी घेवुन लपुन बसला. व ती जवळ येताच अचानक तिचेवर हल्ला करून तिला खाली पालते पाडुन तीचे तोंडात कापडी बोळा घालुन तीचे डोक्यात मोठा दगड घालुन तिला गंभीर दुखापत करून ठार मारले. त्यानंतर मयत मुलीस खांदयावर उचलुन घेवुन कॅनलचे दरडी लगत घेवुन गेला. व त्या ठिकाणी मृतदेहावरील कपडे काढुन विवस्त्र मृतदेह लिंबाचे झाडाखालील टणटणीचे झुडपात कोणाच्या निदर्शनास येणार नाही अशा ठिकाणी मृतदेह लपवुन ठेवला. त्यानंतर मयताचे शरीरावरील काढलेले कपडे, मोबाईल फोन मुलीने दुकानातुन वस्तु आणलेल्या पिशवीत भरले व पुरावा नष्ट करण्याचे दृष्टीने इतर ठिकाणी लपवुन ठेवले आणि घरी येवुन स्वत:चे अंगावरील कपडे बदलुन ते लपवुन ठेवुन आंघोळ करून घरी थांबला आणि त्यानंतर शोध मोहिम सुरू झाल्यानंतर शोध मोहिमेत सहभागी झाला मुलीचा मृतदेह मयताचे चुलत मामाचे निदर्शनास आल्यानंतर ती मयत झाली आहे या बाबत घटनास्थळावर जावुन खात्री न करता मयतेचे घरी जावुन मयतेची बहिण व भाउ यांना मयत ही या जगात राहिली नाही असे सांगीतले.
अल्पवयीन मुलगा वय १७ वर्षे विधीसंघर्षीत बालक याने क्राईम पेट्रोल, सावधान इंडीया, कंचना-१, कंचना-२ हे दाक्षीणात्य सिनेमे तसेच इतर मालीका पाहुन पुरावा नष्ट करणे इत्यादी बाबीची कल्पना / आयडीया आल्याचे चौकशीत सांगीतले आहे. नमुद अल्पवयीन मुलाने त्याचे चौकशी व जबाबात अशा पध्दतीने गुन्हा केल्याची माहिती व जबाब दिल्याने त्याचे निवेदना नुसार मुलीचे शरीरावरील कपडे तसेच ती घेवुन जात असलेल्या वस्तु हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. अल्पवयीन मुलास मा. पिठासीन अधिकारी सो, बाल न्यायमंडळ येरवडा पुणे यांचे समक्ष हजर करण्यात आलेले आहे. तसेच फिर्यादी नमुद केलेले वरील तिन संशयीत आरोपी यांचा नमुद गुन्हयात सहभाग नसल्याने तसा अहवाल मा. न्यायालयात पाठविलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त स्मीता पाटील, सहा. पोलीस आयुक्त, राम जाधव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस, सहा. पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस उप निरीक्षक विजय जगदाळे, पोलीस उप निरीक्षक भाउ डुबे, पो.हवा. सुरेश हिंगे, विठठल कुंभार, राजु जाधव, पोना संजय जरे, अनिल गोरड, बापु सोनवणे, हनुमंत कांबळे, विरसेन गायकवाड, पोका प्रदिप राळे, मनोज साबळे, नितीन गुंजाळ, निखील वर्पे, अशोक दिवटे, मछिंद्र भांबुरे, उध्दव गर्जे यांनी केलेली असुन सदर गुन्हयाचा अधिकचा तपास पोलीस उप निरीक्षक भाउ डुबे हे करीत असल्याचे चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here