गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : १६ जुलैपर्यंत समभाग खरेदी करता येणार
मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या झोमॅटो आयपीओ विक्रीचा पहिला दिवस खऱ्या अर्थाने हिट ठरला. पहिल्याच दिवशी झोमॅटोच्या आयपीओची १.०७ पटीने विक्री झाली आहे. आजपासून म्हणजेच १४ जुलै ते १६ जुलै या कालावधीमध्ये हे समभाग विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
आज पहिल्याच दिवशी झोमॅटोच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचं प्रमण सर्वाधिक होतं. एकूण ९ हजार ३७५ कोटींच्या या समभागांचा आज विकण्यात आलेल्या हिश्यातून कंपनीने अँकर इन्व्हेस्टर्सकडून तब्बल ४ हजार २०० कोटींची रक्कम उभी केली आहे. अजूनही गुंतवणूकदारांना झोमॅटो आयपीओसाठी बोली लावता येणार असून त्यासाठी ७२ रुपये ते ७६ रुपये प्रति समभाग अशी किंमत ठरवून देण्यात आली आहे.






