अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे वाढदिवशीच निधन

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) : काँग्रेसचे खंदे समर्थक आणि अलिबाग उरण मतदारसंघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७४ वर्षांचे होते. महत्त्वाचं म्हणजे आजच म्हणजे १५ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस आहे.

माजी आमदार मधुकर ठाकूर हे गेल्या ३ ते ४ वर्षांपासून आजारी होते. मधुकर ठाकूर यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला ग्राम पंचायतीपासून सुरुवात केली. अलिबागमधील तत्कालिन झिराड ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते निवडून आले होते. तिथून त्यांनी जिल्हा परिषद आणि मग थेट विधानसभेपर्यंत मजल मारली.

मधुकर ठाकूर यांनी २००४ ते २००९ या काळात अलिबाग – उरण मतदारसंघाचे आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व केलं. काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. राजकीय कारकीर्दीत मधुकर ठाकूर यांनी रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्षपद भूषवलं. याशिवाय त्यांना प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही काँग्रेसने गौरवलं.

दरम्यान, मधुकर ठाकूर यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोनच्या सुमारास अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मधुकर ठाकूर यांनी २००४ मध्ये विधानसभा निवडणुकीत मोठी मजल मारली होती ठाकूर यांनी त्यावेळी तत्कालीन राज्यमंत्री असलेल्या शेकाप उमेदवार मीनाक्षी पाटील यांचा पराभव केला होता. शेकापच्या गडाला सुरुंग लावण्याचं काम ठाकूर यांनी केलं होतं. कारण जवळपास तीन दशकानंतर शेकापचं अलिबागमध्ये पराभव झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here