हँगिंग गार्डनपासून सायकलने राजभवनावर जाणार काँग्रेस नेते

  • महागाई व इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर काँग्रेस
  • आक्रमक : काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : ‘केंद्रातील मोदी सरकारच्या जुलमी व अन्यायी कारभाराने जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईतून जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी सरकार इंधनाचे दर दररोज वाढवत आहे. आजही सीएनजी व पाइप गॅसचे दर वाढवून जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. काँग्रेस पक्ष या महागाईच्या विरोधात रस्त्यावर उतरून निषेध करत आहे’, असे नमूद करत उद्या (गुरुवार) राज्यपालांना आम्ही या प्रश्नावर भेटणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. इंधन, गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. या स्थितीत जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. म्हणूनच काँग्रेसने सरकारविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. ७ जुलैपासून राज्यात विविध आंदोलने करून मोदी सरकारच्या या अन्याय्य महागाई विरोधात आवाज उठवला आहे.

हँगिंग गार्डनपासून राजभवन पर्यंत सायकल रॅली काढून राज्यपालांना निवेदन देणार आहोत. जनतेचा आवाज केंद्र सरकारच्या कानावर पडेल आणि झोपी गेलेले मोदी सरकार जागे होऊन जनतेला दिलासा मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासाठीच काँग्रेसचा संघर्ष सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here