दोन जणांचा मृत्यू : महिला पायलट गंभीर जखमी
जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वर्डी शिवारात वनक्षेत्रात दुपारी साडेचार वाजता हेलिकॉप्टर कोसळले आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर महिला पायलट गंभीर जखमी झाल्या आहेत. प्रशासनाचे पथक तिकडे रवाना झाले असून अद्याप याबाबतची पूर्ण माहीती मिळालेली नाही.
चोपडा तहसिलदार व नायब तहसिलदार घटनास्थळी पोहचत आहेत.घटनास्थळी पोहचण्यासाठी काही किलोमीटर पायी जावे लागत असल्याने प्रशासनाची देखील तात्काळ मदत मिळणे अवघड होते. तरी देखील बचाव पथक घटनास्थळी पोहचले असून बचावकार्य सुरु झाले असल्याची माहीती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
चोपडा तालुक्यातील वर्डी शिवारात असलेल्या सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या राम तलाव परिसरात ही दुर्घटना घडली आहे. कोसळेले हेलिकॉप्टर आहे की प्रशिक्षणार्थीचे विमान आहे याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून महिला पायलट गंभीर जखमी आहे. आदिवासी परिसर असल्याने येथील आदिवासी बांधवांनी हेलिकॉप्टरमधील जखमी महिला पायलटला बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात नेल्याची प्राथमिक माहीती आहे.






