मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : आज (दि.१६) दुपारी एक वाजता इयत्ता दहावी परिक्षेचा निकाल जाहीर झाला. मात्र दोन्ही साईट सुरु होत नसल्याने, विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाईन बघता आलेला नाही. गेल्या सात तासांपासून ही वेबसाईट डाऊन आहे.
माध्यमिक शालांत परीक्षेच्या संकेतस्थळावर अचानक भेट देणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे संकेतस्थळ काही काळासाठी क्रॅश झाल्याने विद्यार्थांना आपला निकाल बघता आला नाही. या सर्व तांत्रिक बिघाडाची चौकशीचेही प्रा. गायकवाड यांनी निर्देश दिले आहेत.
राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला मिळणार होता, मात्र, दोन्ही वेबसाईट डाऊन झाल्या आहेत. वेबसाईट पूर्ववत झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहायला मिळेल. तब्बल सात तासांहून अधिक वेळ झाला तरी तरी वेबसाईट डाऊन आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी यासंदर्भात संताप व्यक्त केला आहे. तर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. दहावीच्या निकालाची वेबसाईट सुरु करण्यासाठी एसएससी बोर्डाचे प्रयत्न सुरु आहेत. बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील आणि तांत्रिक सदस्यांची बैठक सुरु आहे.
तांत्रिक बिघाडाने बंद पडलेले दहावीच्या निकालाचे संकेतस्थळ लवकरच पूर्ववत सुरू करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. संकेतस्थळ लवकरच सुरू होऊन विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बघता येईल असा दिलासा त्यांनी दिला आहे.






