भरघोस गुणांच्या शर्यतीला लागणार सीईटीचा ब्रेक

सीईटी परिक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांना अकरावी प्रवेशासाठी प्राधान्य

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : काल (दि.१६) लागलेल्या दहावीच्या निकालानुसार, राज्यात ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. मुंबईतल्या नामांकित महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशांची चुरस सर्वाधिक असते. या १०० टक्के मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील ३२ विद्यार्थी आहेत. शाळास्तरावर पार पडलेल्या मूल्यमापनामुळे दहावीत विद्यार्थ्यांना भरघोस गुण मिळाल्याने पुढील प्रवेशात मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

सध्या तरी अकरावी प्रवेशात दहावीच्या भरघोस गुणांच्या शर्यतीला सीईटीचा ब्रेक लागला असला तरी दहावीनंतर आयटीआय आणि इतर डिप्लोमा अभ्यासक्रमाकडे वळणाऱया विद्यार्थ्यांना शासकीय संस्थेत प्रवेशासाठी मोठय़ा स्पर्धेला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दहावीच्या परीक्षेत मोठय़ा प्रमाणावर आणि टक्केवारीने विद्यार्थी पास झाल्याने अकरावी आणि आयटीआय प्रवेशासाठी मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थी उत्सुक आहेत. त्यामुळे या प्रवेशांसाठी मोठी शर्यत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र यंदा अकरावी प्रवेशासाठीच्या शर्यतीला सीईटीचा ब्रेक लागणार आहे. अकरावी प्रवेश हे सीईटीच्या आधारे करण्याचे शालेय शिक्षण विभागाने या आधीच जाहीर केले आहे.

सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशात प्राधान्य मिळणार असून सीईटीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यावर सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना उर्वरित रिक्त जागांवर दहावीतील गुणवत्तेनुसार अकरावी प्रवेश मिळणार आहे. यंदा मुंबई विभागीय शिक्षण मंडळातून तब्बल १५ हजार ५४० विद्यार्थ्यांना ९० व त्यापेक्षा जास्त गुण असून ९० ते ८५ टक्क्यांमध्ये २१ हजार ९९२ आणि ८० ते ८५ टक्क्यांदरम्यान ३२ हजार २९४ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना सीईटीतदेखील उत्तम गुण मिळाल्यास अकरावी प्रवेशाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एसएससीबरोबरच सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे विद्यार्थीही प्रवेशाच्या या शर्यतीत असून या विद्यार्थ्यांनाही सीईटीच्या आधारेच अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरविले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here