मुंबईत पावसाळी काळरात्र : चेंबूरमध्ये दरड कोसळून १७ ठार

विक्रोळीत दुमजली इमारत कोसळली, ६ जणांचा मृत्यू

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : शनिवारी (दि.१७) मुंबईच्या अनेक भागांमध्ये शनिवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं चेंबूरमधील राहिवाश्यांसाठी काळरात्र ठरली आहे.

या पावसामुळे अनेक भागांमध्ये तलावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. अनेक भागांमध्ये घरांमध्ये देखील पाणी शिरल्याचं दिसून आलं. मात्र, चेंबूरमध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआयनं दिली आहे.

चेंबूरच्या आरसीएफ परिसरातल्या भारत नगरमध्ये ही दुर्घटना घडली. मध्यरात्री १२.३० ते १ च्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर स्थानिकांनी तातडीने वैयक्तिक पातळीवर बचावकार्य सुरू केलं. त्याच वेळी बचाव यंत्रणेला देखील माहिती देण्यात आली. त्यामुळे माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. या भागात सकाळी पावसाचं प्रमाण जरी कमी झालं असलं, तरी पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर चिखल झाला. त्यामुळे बचावकार्य करण्यात एनडीआरएफच्या जवानांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरांच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगरामुळे नेहमीच या भागातील अशा दुर्घटनेची शंका उपस्थित केली जात होती. मध्यरात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत ५ ते ८ घरांवर कोसळली आणि मलब्याखाली या घरांमध्ये राहणारे लोक दबले गेले.

आत्तापर्यंत ६ जणांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आलं आहे. बचावकार्य अजूनही सुरू असून अजून काही नागरिक मलब्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासोबतच विक्रोळीमध्ये घडलेल्या दुसऱ्या घटनेमध्ये एक दुमजली इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

एनडीआरएफनं दिलेल्या माहितीनुसार, या भागामध्ये ५० मीटरच्या अंतरावर दोन घटना घडल्या आहेत. यामध्ये एका घटनेत दरड कोसळली असून दुसरीकडे बीएआरसीची भिंत कोसळली आहे. या दोन्ही घटनांमध्ये मिळून आत्तापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जणांचा वाचवण्यात बचाव पथकांना यश आलं आहे.

दरम्यान, एकीकडे चेंबूरमध्ये १७ जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता मुंबईच्या विक्रोळी परिसरातून अशीच एक घटना घडल्याची माहिती मिळत आहे. विक्रोळीच्या सूर्यनगर परिसरामध्ये एक दुमजली इमारत कोसळल्यामुळे ६ जणांचा मृत्यू गेल्याचं समोर आलं आहे. घटनास्थळी बचावपथकं दाखल झाली असून अजूनही कुणी मलब्याखाली दबलं आहे का? याचा शोध बचाव पथकाच्या माध्यमातून घेतला जात आहे.

केवळ मुंबईतच नाही, तर जगातही काही देशांमध्ये अधिक पाऊस पडल्यास जनजीवन विस्कळीत होण्याच्या घटना घडत असतात. त्यांमुळे मुबईसारख्या दाट वस्तीच्या शहरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्यास आश्चर्य वाटायला नको, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here