शिवशाहीने संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : तीर्थक्षेत्र आंळदी येथून ज्ञानेश्व माऊलींच्या चांदीच्या पादुका तर देहु येथून जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या पादुका फुलांनी सजविलेल्या शिवशाही बसमधून श्री क्षेत्र पंढरपूरकडे आज सकाळी प्रस्थान झाले. राज्यभरातून १० संतांच्या पालख्यांचे आज पंढरपूरकडे प्रस्थान होत असून सर्व पालख्या वाखरीत एकत्र येणार आहेत. त्यानंतर तेथून पायीवारी करुन त्या पंढरपूरला पोहचणार आहेत.

जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुका देऊळवाड्यातून भजनी मंडपात आणण्यात आल्या. किर्तन झाल्यानंतर या पादुका ४० वारकर्‍यांसह २ शिवशाही बसमधून पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. आळंदी येथे सोमवारी पहाटे घंटानाद झाल्यानंतर आजोळघरातील माऊलींच्या चलपादुका सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर यांच्या हातात दिल्या गेल्या. त्यांच्यासोबत ऊर्जितसिंह शितोळे सरकार आणि पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील, प्रमुख विश्वस्त अभय टिळक व अन्य मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा करण्यात आली. त्यानंतर पादुका पालखीत ठेवून ती पालखी विशेष शिवशाही बसमध्ये ठेवण्यात आली. प्रत्येकी २ विशेष बसमधून पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना करण्यात आली.

जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताई संस्थानच्या संत मुक्ताई पालखीचा पहिला मान असतो. मुक्ताई पालखीचे प्रस्थान झाले असून मुक्ताईच्या पादुका शिवशाही बसने पंढरपूरकडे रवाना झाल्या. अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूरहून आई रुक्मिणीची मानाची पालखी शिवशाही बसमधून पंढरपूरला रवाना झाली. महिला व बालविकासमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी बसला हिरवा झेंडा दाखविला. ८७५ किमींचा प्रवास करुन ही पालखी सोमवारी सायंकाळी पंढरपूरला पोहचणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here