
वॉशिंग्टन – भारतानंतर आता अमेरिकेने चीन विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी व्हिडिओ अॅप टिक टॉकवर बंदी घालणार असल्याचा इशारा दिला आहे. चिनी गुप्तचर विभागाला वैयक्तिक माहिती मिळत असल्याने अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी टिक टॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भारताने ५९ चिनी अॅप्सवर बंदी घातली होती.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले की, ‘टिक टॉक ॲप हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. यामुळे २४ तासांत आम्ही अमेरिकेत त्याच्यावर बंदी घालणार आहोत. याशिवाय सिलिकॉन व्हॅलीच्या तज्ज्ञांनी अमेरिकेला अपील केले होते की, भारताप्रमाणेच अमेरिकेनेही टिक टॉकवर बंदी घालावी.
‘गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अमेरिकेने सैन्यांच्या टिक टॉक अॅप वापरावर बंदी घातली होती. त्यावेळी त्यांनी टिक टॉक अॅपचा आपल्या सुरक्षेचा धोका असल्याचे म्हटले होते. याशिवाय अमेरिकन नौदलानेदेखील टिक टॉकवर निर्बंध घातले. यानंतर फेब्रुवारीमध्ये टिक टॉकने अमेरिकन फेडरल ट्रेड कमिशनला ५७ दशलक्ष डॉलर्स देण्याचेही मान्य केले होते. यात १३ वर्षाखालील मुलांची नावे, ईमेल, पत्ते, ठिकाण इत्यादींची बेकायदेशीर माहिती गोळा करण्याचा आरोप होता.






