नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर राहुल यांच्या भेटीनंतर नानांनी थेट काँग्रेस महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे काँग्रेस या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्यासोबत राहणार नसल्याचं स्पष्ट होत आहे.
यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, आज राहुला गांधी यांच्याशी चर्चा झाली. यावेळी केसी वेणुगोपलही उपस्थित होते. महाराष्ट्रात आज जी काय स्थिती आहे. इतर पक्षांची. त्यात काँग्रेसचा बेस सर्वाधिक आहे. त्यामुळे काँग्रेसचा बेस नियोजनबद्ध कसा वाढवायचा त्यावर सखोल चर्चा या बैठकीत झाली.
विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. तीन वर्ष बाकी आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल. सरकार आणि संघटना या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्याला सर्व पक्षांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे हा वाद संपलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, यात काही वादच नाही, असं नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, राज्यात मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसच्या काही मंत्र्यांना डच्चू देण्यात येण्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला. मंत्र्यांना डच्चू देण्यात येण्याच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. सध्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार नाही. तशी काही चर्चा महाविकास आघाडीत झालेली नाही. पुढच्या काळात फेरबदल होणार की नाही याचा निर्णय हायकमांड घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.






