नवज्योत सिंग सिद्धू यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या ६० आमदारांनी हजेरी

प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होताच सिद्धूंनी अमरिंदर सिंग यांना दिला मोठा धक्का

चंदीगड : पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी सुरु असलेल्या वर्चस्वाच्या लढाईत सिध्दूंचे पारडे आता जड होताना दिसत आहे. आज अमृतसरमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या ६० आमदारांनी हजेरी लावली. त्यामुळे सिद्धू यांनी अमरिंदर सिंग यांच्या गटाला मोठा सुरुंग लावल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धू यांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी घरी दोन व्होल्व्हो बस बोलावल्या होत्या. या व्होल्व्हो बसमध्ये आमदारांना बसवून शक्तिप्रदर्शन करण्याचा सिद्धूंचा मानस आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पक्षाच्या आमदारांना अमृतसर येथील आपल्या निवासस्थानी नाश्त्यासाठी बोलावले होते.

सिद्धू यांनी दिलेल्या निमंत्रणानंतर सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी जाण्याच्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या एकूण ८० पैकी ६० आमदारांनी हजेरी लावली. त्याशिवाय अनेक जिल्ह्यांमधील अध्यक्ष, निगम आणि बोर्डाचे चेअरमनसुद्धा सिद्धूच्या घरी दाखल झाले. सिद्धूसोबत आमदारांनी जाऊ नये यासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दबाव बनवला होता. मात्र तरीही अनेक आमदार आणि पक्षाचे नेते कॅप्टन यांच्या घरी पोहोचले. तसेच अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळातील तीन कॅबिनेट मंत्रीसुद्धा सिद्धूंच्या घरी गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here