नाशिक जिल्ह्यात पावसाचा कहर; सुरगाण्यात अनेक गावांचा संपर्क तुटला

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला असून कालही दिवसभर पाऊस कोसळत होता. या पावसाचा मोठा फटका त्र्यंबकेश्वरला बसला आहे. त्र्यंबकेश्वर शहरात पुराचे पाणी शिरले असून बाजारपेठ जलमय झाली आहे तर त्र्यंबकेश्वर मंदिरातही पाणी शिरले आहे. त्र्यबंकेश्वरमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. अशातच बाऱ्हे ते खोकरविहीर मार्गावर खिर्डी पाडा रस्त्याला असलेल्या फरशी पुलावरून बुधवारी सकाळपासून पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून झगडपाडा, खोकरविहिर, चींचपाडा, चिऱ्याचापाडा, भेनशेत, देऊळपाडा, कहांडोळपाडा, उंबुरने, खिर्डी, भाटी, वडपाडा, सागपाडा, खोबळा , वांगण पाडा, खिरपाडा आदी गावांचा संपर्क तुटला आहे.

बाऱ्हे ते खोकरविहीर मार्गावर झगडपाडा गावाजवळ असलेल्या शिवनदी पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर आजूबाजूच्या डझनभर गावांचा संपर्क तुटला आहे. वळपासच्या गावांना याच रस्त्याने बाऱ्हे येथे दवाखाना व इतर कामांसाठी जावे लागते. परंतु, पूर आल्याने हा मार्ग बंद झाला आहे. तर सुरगाणा आणि नाशिकला जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागत असल्याने परिसरातील नागरिकांना मोठी गैरसोय झाली आहे.

नाशिक जिल्ह्याला प्रादेशिक हवामान विभागातर्फे बुधवारी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला होता. वाऱ्याचा वेग वाढून पावसाची संततधार सुरू राहिली. जिल्ह्यातील धरणक्षेत्रालगतच्या भागातही पावसाने जोर धरला. आज आणि उद्या असे दोन दिवस नाशिकमध्ये वाऱ्याचा वेग अधिक राहणार असून, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्यरात्री व पहाटे ताशी पंधरा ते वीस किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here