सर्वत्र चर्चेत असलेला आसिफ खान आणि रसिका आडगावकारचा विवाह संपन्न

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : काही संघटना आणि सामाजाने या दोघांच्या विवाहाला लव्ह जिहादचं नाव देत विरोध दर्शवल्याने राज्यभर चर्चेत आलेला आसिफ खान आणि रसिका आडगावकार या दोघांचा विवाह गुरुवारी संपन्न झाला आहे.

हा विवाह लव्ह जिहाद असल्याचं म्हणत काही लोकांनी रसिकाच्या कुटुंबावर दबाव टाकला आणि हा विवाह रद्द करण्यास भाग पाडलं. यासंदर्भात वृत्त प्रसारित झाल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह अनेक पुरोगामी संघटनांनी या विवाहाला पाठिंबा दर्शवला. यामुळे आडगावकर आणि खान कुटुंबाने पुन्हा हा विवाह मोठ्या थाटामाटात करण्याचं ठरवलं.

आसिफ आणि रसिका या दोघांनी २१ मे रोजी रजिस्टर पद्धतीने विवाह केला होता. यानंतर या दोघांनी धार्मिक पद्धतीने विवाह करण्याचं ठरवलं. दोन्ही कुटुंबांच्या संमतीनुसार १८ जुलै रोजी दोघांचा विवाह निश्चित करण्यात आला. यानंतर या दोघांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि काही संघटनांनी या नात्याला लव्ह जिहादचं नाव दिलं.

आज अखेर दोन्ही कुटुंबांनी कोणाच्याही विरोध आणि धमक्यांना न जुमानता हिंदू पद्धतीने धुमधडाक्यात हे लग्न लावून दिलं. या विवाहाला टोकाचा विरोध होऊन देखील विवाह सोहळा थाटात पार पडल्यानं रसिकाचे वडील प्रसाद आडगावकर यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here