चिपळूणमध्ये रुग्णालयात पाणी शिरल्याने १० कोरोना रुग्णांचा मृत्यू

वैद्यकिय यंत्रणेत पाणी शिरल्याने प्राणवायू पुरवठ्यासह सर्व यंत्रणा ठप्प

रत्नागिरी -सोगावकर : चिपळूणमध्ये गुरुवारी पहाटेपासून कोसळत असलेल्या पावसामुळे पुराच्या पाण्याची पातळी वाढत गेली. या महापुरामध्ये येथील दोन कोविड केंद्रांमध्ये उपचार घेत असलेल्या १० रुग्णांचा मृत्यू ओढवला. या दुर्दैवी घटनेतील ८ जण अपरांत हॉस्पिटलमध्ये, तर २ जण अन्य एका कोविड केंद्रामध्ये उपचार घेत होते.

दुपारपर्यंत या केंद्रांना पुराच्या पाण्याने वेढले. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी काहीजणांना बाहेर काढणेही अशक्य झाले. त्यातच या केंद्रांमधील प्राणवायू पुरवठ्यासह सर्व प्रकारच्या वैद्यकीय यंत्रणेमध्ये पुराचे पाणी शिरल्याने संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

येत्या तीन दिवसांत ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आणि पुणे, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांतील प्रामुख्याने घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. २७ जुलैपर्यंत कोकणासह मध्य महाराष्ट्रात काही भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळेल. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांतील घाट विभागांमध्ये शनिवारी, २४ जुलैला अतिवृष्टीचा इशारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here