शिरपूर (प्रतिनिधी) : छत्रपतींच्या काळात सरदार बहिर्जी नाईक हे ज्याप्रमाणे स्वराज्याचे कान व डोळे बनून काम करत होते, त्याचप्रमाणे शिवसैनिकांनी विरोधकांच्या तंबूत शिरुन बहिर्जी नाईकांची भुमिका पार पाडावी, असा विश्वास शिवसेनेचे धुळे-नंदुरबार संपर्कप्रमुख ना.बबनराव थोरात यांनी येथे व्यक्त केला. शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने बुधवार दि.21 रोजी शिरपूर तालुक्यात गुजर मंगल कार्यालय येथे शिवसंपर्क अभियानाचा मेळावा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे धुळे-नंदुरबार संपर्कप्रमुख बबनराव थोरात, सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हायुवाधिकारी ॲड.पंकज गोरे, उपजिल्हाप्रमुख भरत राजपुत, विधानसभा संघटक छोटू राजपुत, तालुकाप्रमुख दिपक चोरमले, तालुकाप्रमुख अत्तरसिंग पावरा, शहरप्रमुख देवेंद्र पाटील, माजी शहरप्रमुख मनोज धनगर, एसटी कामगार सेनेचे राजु टेलर, शिक्षक संघटनेचे एस.एन.पाटील, खासेराव पाटील, मसुद शेख, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका विणाताई वैद्य, तालुका संघटिका अर्चनाताई देसले, सुशिला पावरा, युवतीसेनेच्या तालुका युवाधिकारी लक्ष्मी कोकणी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना श्री.थोरात म्हणाले की, शिरपूर तालुक्यात पक्षाची परिस्थिती ही प्रतिकूल आहे. मात्र बाळासाहेबांनी आपल्याला रडायला नाही तर लढायला शिकवले आहे. या प्रतिकूल परिस्थितीतही विरोधकांवर मात करुन शिरपूर नगरपालिकेवर भगवा फडकावयाचा आहे. सत्तेचे हे चक्रव्युह कसे भेदता येईल याची संकल्पना अंमलात आणण्यासाठी प्रशिक्षणाचा हा मेळावा आहे. पक्षाचे एखादे धोरण ठरल्यास ते सामान्यांपर्यंत पोहोचविण्याऐवजी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसमोर ‘होयबा’ करुन घरी झोपा काढणारी माणसे ही पक्षासाठी धोकादायक आहेत. पक्षातील अशा लोकांमुळे विरोधकांना बळ मिळते. असे असले तरी, आम्हाला कुणी आव्हान देण्याची भाषा करु नये. दिल्यास प्रतिआव्हान देण्यात येईल कारण, शिरपूर विधानसभा मतदार संघातील शिवसैनिक जागृत झाला आहे. छत्रपतींच्या विचारांचा वारसा घेऊन बाळासाहेबांच्या विचारांनी पेटलेली माणसे ही माणसे आहेत. बाळासाहेबांनी आपणा सर्वांच्या मनात विचारांची ठिणगी पेटवलेली आहे. चांगल्या आचारणाची, चांगल्या विचारांची माणसे सोबत घेऊन त्या ठिणगीला प्रज्वलित करायचे आहे. ती प्रज्वलित झाल्यास शिरपूरात क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही ना.बबनराव थोरात यांनी व्यक्त केला. तसेच शिवसेना संपर्क मेळाव्याचे आयोजन कशासाठी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यानंतर जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, लक्ष 2022 हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिवसंपर्क अभियान राबविण्याचे आदेश पक्षप्रमुख मा.उध्दवसाहेब ठाकरे यांनी दिले आहे. त्याची अंमलबजावणी सुरु आहे. त्याला जनतेचा उर्त्स्फूत असा प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी यांचा विश्वास उध्दवसाहेबांवर वाढला आहे. येणाऱ्या शिरपूर नगरपंचायत, नगरपरिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सगळ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा झेंडा रोवायचा आहे. कोविड-19 मुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्थगित झाल्या. मात्र ही संधी असून जास्तीत जास्त वेळ प्रचारासाठी मिळाला आहे. त्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे लागेल, असे म्हणत ‘महात्मा फुले कर्जमुक्ती योजना’, ‘माझे गांव कोरोनमुक्त गांव’ अभियान, ‘गांव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक’ अभियान, कोरोना काळात केलेल्या कामांची श्री.साळुंके यांनी माहिती दिली. यावेळी शहरप्रमुख देवेंद्र पाटील, तालुका संघटिका अर्चनाताई देसले, खासेराव पाटील, तालुकाप्रमुख दिपक चोरमले, तालुकाप्रमुख अत्तरसिंग पावरा, भरतसिंग राजपुत यांनीही आपली मनोगते यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी तुषार महाले, युवासेना तालुकाप्रमुख विजय पावरा, विकास सेन, दिनेश गुरव, सरफराज शेख, बबलू शेख, वाजिद मलिक, वाहतुक सेनेचे तालुकाप्रमुख रविंद्र जाधव, सागर माने, निलेश वाल्हे, गोलू मराठे, नंदु सोनार, दिलीप मराठे, सुकलाल पावरा, किरण मोरे, आबा मराठे, शोएब शेख यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, शिवसेना, युवासेना, युवतीसेना, एसटी कामगार सेना, वाहतुक सेना, शिक्षक सेना आदी संलग्न संघटनेचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन जितेंद्र राठोड, अनिकेत बोरसे यांनी केले.






