टोकियो : आज शेवटच्या सेकंदापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीय हॉकी संघाने न्यूझीलंडवर ३-२ ने मात केली. या विजयाने भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिमधील आपल्या विजयी अभियानाची सुरुवात केली आहे.
भारताकडून हरमनप्रीत सिंगने दोन तर रूपिंदरपाल सिंग याने एक गोल केला. तर सामन्याच्या अखेरच्या क्षणांमध्ये गोलरक्षक श्रीजेश आणि बचाव फळीने केलेला अभेद्य बचाव भारताच्या विजयामध्ये निर्णायक ठरला. या लढतीला सुरुवात झाल्यावर पहिल्या क्वार्टरमध्ये सहाव्या मिनिटाला गोल करून न्यूझीलंडने सामन्यात आघाडी घेतली. मात्र दहाव्या मिनिटाला रूपिंदरपाल सिंगने गोल करून भारताला बरोबरी साधून दिली. पहिल्या क्वार्टरच्या अखेरीच दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत होते. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये २६ व्या मिनिटाला हरमनप्रित सिंगने गोल करून भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. मध्यांतरापर्यंत भारताने ही आघाडी कायम राखली.
त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये ३३ व्या मिनिटाला अजून एक गोल करत हरमनप्रीत सिंगने ही आघाडी ३-१ अशी वाढवली. त्यानंतर ४३ व्या मिनिटाला न्यूझीलंडने दुसरा गोल करून भारताची आघाडी कमी केली. त्यानंतर चौथ्या आणि अखेरच्या क्वार्टरमध्ये न्यूझीलंडने जोरदार आक्रमण करून भारताची बचावफळी भेदण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, त्यांना काही पेनल्टी कॉर्नरही मिळाले. मात्र भारताचा गोलरक्षक श्रीजेश याने चपळ गोलरक्षण करत भारताचा बचाव अभेद्य राखला. अखेरीस भारताने ही लढत ३-२ अशा फरकाने जिंकून ऑलिम्पिकमधील आपल्या अभियानाची विजयी सुरुवात केली.






