भारतीय रेल्वे मंत्रालयातर्फे मीराबाई चानूला २ कोटींचे बक्षीस आणि प्रमोशन

mirabai-chanu-announces-rs-2-crores-by-railway-minister

नवी दिल्ली : ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकावून इतिहास रचणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानूचे काल मायदेशात जोरदार स्वागत झाले. क्रीडा मंत्रालयाकडून आयोजित एका कार्यक्रमात क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक यांच्यासह किरेन रिजीजू, सर्वानंद सोनोवाल आणि जी कृष्ण रेड्डी हे केंद्रीय मंत्रीही उपस्थित होते.

रिजीजू आणि सोनोवाल हे आधी क्रीडा मंत्री होते. ऑलिम्पिकच्या काही आठवड्यापूर्वी अनुराग ठाकूर हे क्रीडा मंत्री झाले. अनुराग ठाकूर यांनी ट्वीटरवर एक फोटो शेअर केला. यासह त्यांनी हा आमचा विजयी पंच असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. हिमाचली टोपी, शॉल देऊन चानू आणि तिच्या प्रशिक्षकांचा ठाकूर यांनी गौरव केला.

रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मीराबाई चानूचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी मीराबाई चानूला २ कोटींच्या बक्षीसासह प्रमोशन देण्याचीही घोषणा केली. मीराबाई चानू ही स्पोर्ट्स कोट्यातील रेल्वेची कर्मचारी आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. आगामी काळात भारतीय खेळाडू आणखी पदक जिंकतील, असं मीराबाई चानूचे प्रशिक्षक यावेळी म्हणाले.

देशवासियांच्या शुभेच्छांमुळे आणि प्रेमामुळे मी हे पदक जिंकू शकले. अधिकाधिक तरुणांनी क्रीडा क्षेत्रात प्रवेश करून देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करावी, असं आवाहन मीराबाई चानूने केलं.

यापूर्वी वेटलिफ्टींगमध्ये २००० ला झालेल्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने कांस्य पदक जिंकले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here