सुमारे १५ किलो ४० ग्रॅम वजनाचा ३ लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त
नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : तळोजापासून जवळच असलेल्या तोंडरे गावातील आझाद ढाब्यावर गांजा विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावरून तळोजा पोलिसांनी येथे छापा मारला असता. ढाब्यामध्ये लपवून ठेवलेला सुमारे १५ किलो ४० ग्रॅम वजनाचा ३ लाख रुपये किंमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी अमित आझाद सिंग उर्फ रोहित (३०) व छोटेलाल गिरीलाल पाल (३५) या दोघांना अटक करण्यात आली असून, या दोघांनी हा गांजा कुठून आणला याचा तपास पोलिस करीत आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, तळोजा येथील तोंडरे गावातील आझाद ढाब्यामधून दोन व्यक्ती अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती तळोजा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पवार व त्यांच्या पथकाने तोंडरे गावातील आझाद ढाब्यावर छापा मारला.
यावेळी तेथे असलेल्या अमित सिंग व छोटेलाल पाल या दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्या खिशामध्ये काही प्रमाणात गांजा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी सगळीकडे तपासणी केली असता, खोलीमध्ये लाकडी बेडच्या आतमध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये लपवून ठेवलेला सुमारे ३ लाख रुपये किंमतीचा १५ किलो ५० ग्रॅम वजनाचा उग्र वासाचा ओलसर गांजा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करून दोघांना अटक केली.






