पूरग्रस्तांकरिता ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय

दहा हजारांची रोख मदत, पाच हजारांचं धान्य : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून तातडीचे मदत म्हणून घरात पाणी शिरलेल्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याचं जाहीर केलं आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे. तसेच, अन्नधान्यांचं नुकसान झालेल्यांना पाच हजार रुपयांची तत्काळ मदत देण्यात येणार आहे.

प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पुरामध्ये जी घरं गेली किंवा घरात पुराचं पाणी शिरलं आहे, त्या सगळ्या ठिकाणी सर्व कुटुंबास दहा हजार रुपये नगदी रुपाने व पाच हजार धान्य रुपाने ही मदत देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे व मदत देणार आहोतच, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.

याशिवाय पूर्णपणे घर पडलं असेल त्याला देखील मदत दिली जाणार आहे. ज्यांचा मृत्यू झाला असेल, त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली आहे. यातील एक लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून व चार लाख रुपये एसडीआरएफमधून असे संपूर्ण पाच लाख रुपये महाराष्ट्र सरकारकडून संबंधित कुटुंबास दिले जाईल. असं देखील विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

सरकार म्हणून जे काही करणं आवश्यक आहे ते आम्ही करू, नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत केली जाईल. मदत पुरवठा होताना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ देणार नाही.जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना तशा सूचना देखील दिल्या गेल्या आहेत. एकदा संपूर्ण आढावा आला की, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणचा सगळा एकत्रित आढावा घेऊन आर्थिक मदत देखील दिली जाईल. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. चिपळूण येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली व यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here