नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमध्ये दरड दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यु झाला आहे. किनौर जिल्ह्यामध्ये बटसेरीच्या गुंसा जवळ छितकुलहून सांगलाकडे जाणारी पर्यटकांची गाडी भूस्खलनात सापडली. पर्यटकांच्या गाडीवर मोठमोठे दगड पडल्याने ९ जणांचा मृत्यु झाला. यामध्ये २०१३ साली केबीसीमध्ये सहभागी झालेल्या डॉ. दीपा शर्मा यांचे निधन झालं आहे.
दीपा यांनी केबीसीच्या ७ व्या पर्वामध्ये सहभाग घेत ६.४० लाख रुपये जिंकले होते. दीपा यांचा मोठा भाऊ महाराष्ट्रातील विद्युत वितरण विभागात इंजिनिअर आहे. दीपा राहत असलेल्या शांतीनगरमध्ये शेजाऱ्यांनी दीपाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
कोरोनाकाळात दीपाने नागरिकांना मदत केली होती. दीपा यांचं पंचकर्म विषयात आपलं पदव्युत्तर शिक्षण झालं होतं. सोशल मीडियावर दीपा सक्रीय असायच्या. त्यांना ट्विटरवर २० हजारापेक्षा जास्त लोक फॉलो करायचे. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांमध्ये एका नेव्ही अधिकाऱ्याचा समावेश असून राजस्थानच्या सिकर येथील तिघांचादेखील या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.एकूण ९ जणांचा मृत्यू झाला असून ४ राजस्थानचे, दोन छत्तीसगढचे, एक दिल्ली आणि एक महाराष्ट्राचा रहिवाशी असून एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.






