सांगली (प्रतिनिधी दिनेश लोंढे) : येथील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम निघाले असताना अचानक गाडीसमोर एका व्यक्तीने धाव घेतली. त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी ताफ्यातील एका गाडीने तातडीने वाट बदलली. पण यात गाडीचा ताबा सुटल्यामुळे भीषण अपघात झाला.
या अपघातामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. पण सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून विश्वजीत कदम हे सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केल्याचं सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाडीचा अपघात इतका भीषण होता की कार रस्त्याच्या बाजूला थेट उलटी झाली. यामध्ये कृषिमंत्री विश्वजित कदम हे सुखरूप आहेत. ते सांगली जिल्ह्यात पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु आहेत.






