बनावट सोने तारण घोटाळा : ‘नगर अर्बन’च्या शेवगाव शाखा व्यवस्थापकाची आत्महत्या

नगर (प्रतिनिधी) : नगर अर्बन बँकेतील अनेक घोटाळे उघड होत असतानाच बँकेच्या शेवगाव शाखेचे व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (वय ५८, रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीला आली आहे.

दरम्यान, त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत बँकेतील सोने तारण घोटाळ्याला गोल्ड व्हॅल्युअर आणि संबंधित कर्जदारच जबाबदार असल्याचा उल्लेख केला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे बनावट सोने तारण घोटाळा आता चांगलाच गाजणार आहे.

नगर अर्बन बँक शेवगाव शाखेचे व्यवस्थापक गोरक्षनाथ शिंदे हे 31 मे 2021 रोजी सेवानिवृत्त झाले होते. मात्र, बँक प्रशासनाने त्यांचा सेवाकाळ तीन महिन्यांसाठी वाढवून दिला होता. आज सकाळपासून गोरक्षनाथ शिंदे घरातून बाहेर पडले होते. सकाळपासून ते घरी न आल्यामुळे त्यांच्या घरच्यांनी शोध घेतला असता दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी शेतामध्ये विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.

याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह नगर येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here