बांधकाम सुरू असलेली इमारत बाजूच्या घरांवर कोसळली : पाच जण गंभीर जखमी
मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : मागील आठवड्यात गोवंडीत इमारतीचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच अंधेरीत बांधकाम सुरू असलेली इमारत घरांवर कोसळली आहे. या दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी आहेत.
अंधेरी पश्चिममधील जुहू गल्ली परिसरातील मेहता बाबा चाळ ही चार मजली इमारत कोसळली. मंगळवारी रात्री १२.३०च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. बांधकाम सुरू असलेली ही इमारत बाजूला लागून असलेल्या घरांवर कोसळली होती. या दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना कुपर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.
Maharashtra: A four-storey building collapsed in Andheri area of Mumbai last night. Five people sustained injuries in the incident and were admitted to a hospital. pic.twitter.com/cHu9euJOyH
— ANI (@ANI) July 28, 2021
अकबर शेख (६०), चांद शेख (३४), अरिफ शेख (१७) आणि अजरा शेख (१८) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, समशुद्दीन शेख (५०) यांना उपचारांनंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगारे बाजूला करुन जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.






