राज्यातल्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल – आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : राज्यातील करोनाच्या रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेता ज्या ठिकाणी रुग्णसंख्येचं प्रमाण घटत आहे, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीत ठरल्यानुसार, राज्यातल्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. तर उर्वरीत ११ जिल्ह्यांमध्ये कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत. या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली किंवा परिस्थिती बिघडली, तर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून तेथील निर्बंध वाढण्यात येतील, असं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, राज्यातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. त्यामध्ये शिथिलता दिली जाईल, असं ते म्हणाले. यासंदर्भात अंतिम प्रस्ताव सहीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला असून मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर त्यावर येत्या १ ते २ दिवसांमध्ये जीआर निघेल असं देखील ते म्हणाले.

उरलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये सध्या अस्तित्वात असलेले निर्बंध कायम राहणार आहेत. किंबहुना, तिथे रुग्णसंख्या वाढल्यास किंवा परिस्थिती बिघडल्यास त्या ठिकाणी स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून निर्बंध अधिक वाढवण्याचा देखील निर्णय घेतला जाऊ शकतो, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. त्यानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हे जिल्हे, कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर हे जिल्हे, मराठवाड्यातील बीड तर उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरमधील निर्बंध कायम राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here