कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या सूचना

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापन दिन रविवार दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी साजरा करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्याकरिता ‘ब्रेक दी चेन’अंतर्गत शासनाने ४ जून २०२१ अन्वये आदेश पारित केले आहेत. गत वर्षीप्रमाणेच यावर्षीही राज्यात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. हा कार्यक्रम साजरा करताना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी, असे निदेश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात आले आहेत.

राज्यात सर्व विभागीय, जिल्हा, उपविभागीय, तालुका मुख्यालयात तसेच ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात यावा. पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती व कोकण विभागीय आयुक्त यांनी आपापल्या विभागातील तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्याची योग्य ती व्यवस्था करावी.

राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत मंत्रालय येथे सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. पुणे येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी संबंधित पालकमंत्री ध्वजारोहण करतील. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ९.०५ वाजता आयोजित करण्यात यावा. या दिवशी सकाळी ८.३५ ते ९.३५ या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी ८.३५ वाजेपूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावा. राष्ट्रध्वजाला वंदन करताना राष्ट्रगीत वाजविण्यात यावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बॅण्ड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजवावा. यावेळी करण्यात येणाऱ्या भाषणांचा विषय हा स्वातंत्र्यदिनाचे महत्व विषद करणारे तसेच उपस्थितांना देशाची एकता व अखंडता याकरीता कार्य करण्यासाठी प्रेरित करणारे असावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

ध्वजारोहण करणारे मंत्री, राज्यमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी वेळेवर पोहचू शकणार नसल्यास विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहण करुन ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी. संबंधित प्रांत अधिकारी व तहसिलदार हे अनुक्रमे उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालय आणि सरपंच किंवा गाव प्रमुख हे ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करतील. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहिद जवानांच्या पत्नींना व आई-वडील तसेच कोरोनायोध्दे जसे डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्यसेवक यांच्यासह या आजारावर मात केलेल्या काही नागरिकांना निमंत्रीत करावे.

कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता स्वातंत्र्यदिनाचा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियम पाळून संपन्न होईल, याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांची असेल, आयोजकांनी त्यानुसार मान्यवरांना निमंत्रित करण्याची कार्यवाही करावी. समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा. सर्वांसाठी मास्क बंधनकारक आहे. सुरक्षित वावराच्या सर्व नियमाचे काटेकोर पालन करावे व अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी वेबसाइटद्वारे थेट प्रक्षेपण करावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here