टोकियो : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या साखळी फेरीत अ गटातील अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय संघानं यजमान जपानवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह १२ गुणांची कमाई करताना भारतानं अ गटातील दुसरे स्थान पक्के केले आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यांच्यासमोर ब गटातील तिसऱ्या क्रमांकावरील संघाचे आव्हान असणार आहे.
अ गटातील अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय संघानं मध्यांतराला २-१ अशी आघाडी घेतली. पहिल्या सत्रात १३व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगनं पेनल्टी कॉर्नवर गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १७व्या मिनिटाला गुरजंत सिंगनं मैदानी गोल केला. सिमरनजीत सिंगनं चेंडूवर ताबा राखताना चेंडू गोलपोस्टच्या दिशेनं भिरकावला, परंतु तो गोलखांब्यावर लागून माघारी परतला, नजिकच उभ्या असलेल्या गुरजंतनं गोल करून भारताची आघाडी २-० अशी मजबूत केली. जपानकडून १९व्या मिनिटाला पहिला गोल आला तो केंटो तनाकाच्या स्टीक्समधून. भारताचा गोलरक्षक पी आर श्रीजेश यानं जपानचे गोल अयशस्वी ठरवले त्यामुळे भारताला पहिल्या हाफमध्ये २-१ अशी आघाडी कायम राखता आली.
दुसऱ्या सत्रात जपानकडून कोटा वॅटानाबेनं ( ३३ मि.) गोल करताना बरोबरीचा आनंद साजरा केला, परंतु तो पुढच्याच मिनिटाला मावळला. समशेर सिंगनं पुढच्याच मिनिटाला अप्रतिम मैदानी गोल करून भारताला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. भारतानं डी वर्तुळावर वर्चस्वपूर्ण खेळ करताना जपानवर दडपण कायम ठेवण्यात यश मिळवले होते. चौथ्या सत्रात जपाननं आक्रमक खेळावर भर देताना भारताच्या डी वर्तुळात कूच केली. सामना संपण्यास १० मिनिटांचा कालावधी शिल्लक करताना जपानचा खेळाडू गोल करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता, परंतु गोलरक्षक श्रीजेशनं डाईव्ह मारून त्यांना बरोबरी मिळवून दिली नाही. त्या काही सेकंदात श्रीजेशनं जपानचं तीन प्रयत्न हाणून पाडले.
५१व्या मिनिटाला निळकंठ शर्मानं मैदानी गोल करून भारताची आघाडी ४-२ अशी मजबूत केली. त्यानंतर कॉर्नरवर हरमनप्रीत सिंगच्या स्टीक्समधून आलेल्या चेंडूला गुरजंत सिंगन दिशा दाखवून ५-२ अशी दमदार आघाडी घेतली. गुरजंतचा हा सामन्यातील दुसरा गोल ठरला. ५९व्या मिनिटाला जपानकडून काजुमा मुराटानं गोल कडून पिछाडी ३-५ अशी कमी केली.






