मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. या पुरात अनेकांची घरे पाण्याखाली जाऊन अतोनात नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत होत असतांना आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पूरग्रस्तांना मोठा दिलासा दिला आहे. पूरग्रस्त भागात वीज बिल वसुली करू नका, असे आदेश राऊत यांनी दिले आहेत. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर बिल भरण्यासाठी सवलत दिली जाईल, असं राऊत यांनी म्हटलं आहे. वीज बिल माफीचा निर्णय अद्याप झालेला नाही. तो निर्णय मंत्रिमंडळ घेऊ शकेल, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.
रत्नागिरी जिल्ह्यात २२ जुलैला झालेल्या ढगफुटी व अतिवृष्टीमुळे मुख्यत: चिपळूण, खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात महावितरण व महापारेषणच्या यंत्रणांचे अतोनात नुकसान झालं आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नितीन राऊत यांनी आज चिपळूण तालुक्याला भेट दिली.
पुरामुळे नादुरुस्त झालेले मीटर ग्राहकांना त्वरित बदलून देण्याचे निर्देश राऊत यांनी यावेळी महावितरणला दिलेत. भीषण पूरपरिस्थिती असताना स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचं त्यांनी यावेळी कौतुक केलं.






