मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख या दोघांना ई़डीने चौकशीसाठी आज सकाळी ११ वाजता मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर अनिल देशमुखांना आज ईडीकडून अटक होण्याची शक्यता काही जणांनी व्यक्त केली आहे.
अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील विविध बार, रेस्टॉरंट्सकडून दरमहा १०० कोटी रुपयांचे वसुली करण्याचे पोलीस अधिकाऱ्यांना आदेश देण्याचा आरोप आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी रुपये वसुल करण्याचा आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अनिल देशमुखांवर सीबीआय आणि ईडीने गुन्हा नोंद केला होता.
वसुली प्रकरणात ईडीने २५ जूनला अनिल देशमुखांच्या घरी छापेमारी सुरु केली होती. त्यानंतर अनिल देशमुखांचे पीए कुंदन शिंदे आणि पीएस संजीव पलांडे यांची ईडीने चौकशी करुन त्यांना अटक केली होती. त्यानंतर अनिल देशमुखांना ईडीने समन्स बजावला होता पण प्रकृतीचे आणि कोरोनाचे कारण सांगून ही चौकशी ऑनलाईन व्हावी अशी मागणी अनिल देशमुखांनी केली होती.






